वाचकांसाठी सर्वोकृष्ट योगसाधना

वाचन करतांना होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती..

0

लोकशाही विशेष लेख

 

वाचकांना त्यांच्या वाचनाची भूक भागविण्यासाठी ग्रंथकार (librarian), लेखक (Author), सार्वजनिक ग्रंथालये, पुस्तक मंडळे आपापल्या परीने उत्कृष्ट सेवा प्रदान करीत आहेत. अशा लेखकांना, ग्रंथालयांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक चळवळ उभी केली आहे. ग्रंथालय सशक्त करणे, वाचन चळवळ रुजविणे–वाढविणे, पर्यायी एक सशक्त समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करत राहणे यातून ग्रंथालयांचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. मात्र हल्लीच्या युगात व्यक्तींना इतके विकार जडले आहेत की, व्यक्ती एकाग्र मनाने पुस्तक वाचनासाठी बसूच शकत नाही. यात केवळ शारीरिकच नाही तर मानसिक विकारांचा देखील अंतर्भाव होतो. स्पर्धा परीक्षांचा (Competitive Examination) अभ्यास करणारे विद्यार्थी तासंतास अभ्यासिकेत बसून वाचन करतांना दिसतात. त्यांच्या अशा दिनचर्येमुळे मानेचे, पाठीचे किंवा कमरेचे दुखणे वाढले आहे. त्यांच्या मेरुदंडाचा वाक अनैसर्गिक होत आहे. अशावेळी शरीराची स्थिरता आणि मनाची एकाग्रता जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत वाचन संस्कृती फळाला येऊ शकत नाही. उत्कृष्ट वाचक तोच जो पुस्तकातील आशय आपल्या जीवनशैलीत अंतर्भाव करेल पण हल्लीच्या काळात असे होतांना दिसत नाही.

एका योगसाधक म्हणून योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवितांना, अनेक साधकांना योगाचे धडे देत असतांना साधक वाचनासंबंधी अनेक प्रश्न वारंवार विचारतांना दिसतात. तो म्हणजे मुले वाचनाचा कंटाळा करतात? वाचले तर लक्षात राहत नाही? वाचन करताना आळस येतो? वाचन करताना एकाग्रता साधली जात नाही? यावर योगसाधनेतून काही उपाय आहे का? असे एक ना अनेक प्रश्न सतत पालकांकडून विचारण्यात येत असतात. याउलट केवळ लहान मुले किंवा विद्यार्थीच नव्हे तर अनेक थोरा-मोठ्यांना देखील वाचनाचा कंटाळा येतो शिवाय वाचन करताना अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे व्यवस्थित वाचन होत नाही किंवा वाचन टाळले जाते. यावर योगसाधनेतून उत्तम उपाय आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

योगसाधना केवळ शारीरिकच नाही तर बौद्धिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक अशा सर्व पातळ्यांवर एकसमान कार्य करते. योगसाधनेमधील काही प्रकारांचा अभ्यास केला असता, वरील समस्यांवर उपाय योजना करता येऊ शकतात. ज्यात ओंकार साधना, सूर्यनमस्कार, तोलात्मक आसने, भ्रामरी प्राणायाम, शुद्धीक्रियांमधील कपालभाती आणि त्राटक क्रिया तर काही मुद्रांचा समावेश होतो. ओंकार हा अनाहत नाद आहे. कोणताही नाद उत्पन्न होण्यासाठी दोन वस्तूंचा एकमेकांवर आघात होणे महत्त्वाचे असते. परंतु, ओंकार हा कोणत्याही आघाताविना उत्पन्न झालेला ध्वनी आहे. ओंकाराच्या माध्यमाने मस्तिष्कावर आणि शरीरावर परिणाम दिसून येतो. ओंकाराच्या उच्चारणामुळे मेंदू, मज्जारज्जू कार्यान्वित होऊन अधिक ऊर्जा प्राप्त होऊन यामुळे बुद्धिमत्ता सूक्ष्म होते. तसेच पीयूष ग्रंथींवर चांगला परिणाम होऊन सकारात्मकता वाढीस लागते आणि ओंकाराच्या उच्चाराने आत्मिक शांतता मिळते; नैराश्य दूर होऊन मुलांच्या मनावर संस्कार होऊन बुद्धिमत्ता वाढीस मदत होते.

व्यक्ती अधिक शांत होण्यास मदत होते. ओंकारातील ‘म’ कार लांबविल्यास सूक्ष्म स्पंदने आणि लहरी निर्माण होऊन मस्तिष्काच्या दिशेने जातात. ज्यामुळे संपूर्ण मज्जासंस्थेवर सकारात्मक परिणाम होऊन चंचलता कमी होते आणि एकाग्रता वाढीस लागते. परिणामी वाचकांची एकाग्रता साधली जाऊन पुस्तकीय मर्म अधिक काळापर्यंत लक्षात राहू शकतो. सूर्यनमस्कार केल्याने शारीरिक आणि मानसिक सर्वांगीण विकास साधता येतो. शरीर आणि मन एकसमान पातळीवर कार्य करण्यास सक्षम ठरतात. यामुळे भावनिक स्थैर्य प्राप्त होते. सूर्यनमस्कारमधील १२ पावित्र्याचे उच्चारण करताना त्यात बारा बीज मंत्र येतात. या बीज मंत्रांचा आणि सूर्याच्या १२ नावांचा उच्चार करताना शरीरातील सप्तचक्र जागृत होतात. त्यामुळे साधकाचे सर्व चक्र नियंत्रित होतात आणि साधकास निरोगी काया आणि उत्तम बुद्धिमत्ता प्राप्त होते. साधकाची वाचा शुद्ध होऊन साधक वाकपटू होतो. भ्रामरी प्राणायामने मज्जासंस्थेकडे जाणारा रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा वाढून मेंदू शांत होतो. चंचलता कमी होऊन एकाग्रता वाढण्यास मदत होते. आत्मविश्वास वाढतो अन् मेंदूतील पीयूष ग्रंथीचे कार्य सुधारते, आकलन व ग्रहणशक्ती वाढते. यामुळे स्मरणशक्तीत वाढ होते.

भ्रामरी प्राणायाममुळेदेखील (Bhramari Pranayama) शरीरात सूक्ष्म लहरींची निर्मिती होते. परिणामी वाचनातील गोडी वाढून वाचन अधिक काळ स्मरणात राहण्याची क्षमता निर्माण होते. तोलात्मक आसनामुळे एकाग्रता साधण्यास मदत होते. योगसाधनेत दंडस्थितीतील आसने म्हणजे उभे राहून करावयाच्या आसनांना दंडस्थितीतील आसने म्हणतात. या तोलात्मक आसनामध्ये दृष्टी एका बिंदूवर स्थिर केली असता आसन उत्कृष्ट साधता येते, यातूनच एकाग्रता साधण्यास मदत होते. यात ध्रुवासन, गरुडासन, डोलासन, शीर्षासनसारख्या काही आसनांमुळे एकाग्रता साधली जाऊन वाचकांनी केलेले वाचन अधिक एकाग्रतेने होऊ शकेल. शुद्धीक्रिया या शरीराच्या अंतर्गत शुद्धीकरिता करण्यात येतात. यातीलच कपालभाती ही फुप्फुसांची शुद्धीक्रिया आहे. मात्र या क्रियेत रक्ताचा प्रवाह नेहमीपेक्षा अधिक मात्रेत मेंदूच्या दिशेने असतो. त्यामुळे व्यक्तीच्या मस्तिष्काला अधिक मात्रेत ऑक्सिजनचा पुरवठा होतो. परिणामी साधक नेहमी सक्रिय राहतो. या शुद्धी क्रियांतर्गतच त्राटक ही क्रिया येते. या क्रियेच्या अभ्यासाने साधक आपल्या डोळ्यांचे आरोग्य राखू शकतो.

त्राटकच्या नियमित अभ्यासाने अनेकांच्या चष्म्याचे नंबर कमी झालेले आढळून आले आहे. शिवाय त्राटक क्रियेमुळेदेखील एकाग्रता साधण्यास मदत होते. सर्वात महत्वाचे म्हणजे त्राटक क्रियेमुळे माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे ‘आळस’ निघून जातो. पुस्तक वाचतांना येणारा आळस – कंटाळा ही सर्वात मोठी समस्या यात दूर होते. वाचनासंबंधी मुद्रांचा विचार केला असता, पुस्तक मुद्रा आणि ध्यान मुद्रा उपयोगी ठरतात. पुस्तक मुद्रेच्या नावातच ‘पुस्तक’ हा शब्द आहे. ‘वाचन करत असताना ही मुद्रा लावली असता, वाचलेले पुस्तकीय मर्म दीर्घ काळ स्मृतीत साठून राहते.’ हे या मुद्रेचे खास वैशिष्ट्य आहे. तर ध्यान मुद्रा ही योगियांची अतिशय प्रिय मुद्रा आहे. या मुद्रेमुळे साधक अतिशीघ्र ध्यानात प्रवेश करू शकतो. ध्यान साधनेमुळे साधाचे ज्ञानचक्षु उघडतात. अशाप्रकारे वाचकांच्या अनुषंगाने काही योगिक क्रिया आहेत. ज्यांच्या साह्याने केवळ वाचन हा विषयच नाही तर साधक आपल्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतांचादेखील विकास करू शकतो. अनेक असाध्य आजार यातून बरे होऊन साधक एका ध्येयाप्रती जाऊन आपला उत्कर्ष साधू शकतो.

कृणाल दिलीप महाजन
सहायक प्राध्यापक
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक
९२०९२५०५५५

Leave A Reply

Your email address will not be published.