प्रख्यात शस्त्रवैद्य व आयुर्वेदाचार्य आचार्य सुश्रुत

0

लोकशाही, विशेष लेख

 

सुश्रुत हे एक आयुर्वेदाचार्य (Ayurvedacharya) आणि शल्यतंत्रपारंगत होते. यांचा काल निश्चित सांगता येत नाही. ते वाग्भटाच्या पूर्वीचे आणि अग्निवेशाच्या समकालीन होते. पाणिनीने अष्टाध्यायीच्या गणपाठात ‘सौश्रुत पार्थिवा’ असा पाठ दिला आहे. त्यावरून सुश्रुत हे पाणिनीच्या पूर्वकाली होऊन गेले आणि पाणिनीच्या काळी त्यांचे शिष्य किंवा पुत्र विद्यमान होते असे कळते. सुश्रुत (Sushruta) हे विश्वामित्राचे (Vishwamitra) पुत्र होते असे सुश्रुतसंहितेवरून कळते (चिकित्सा. २.३) पण श्री. प्रफुल्लचंद्र राय हे विश्वमित्राचा सुश्रुताशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे सांगतात. कदाचित ते विश्वामित्राचे गोत्रज असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या एका परंपरेप्रमाणे सुश्रुत हे शालिहोत्राचे पुत्र होते. काश्यपसंहितेच्या उपोद्घातात श्री. राजगुरु हेमराज हे या बाबतीत हेमाद्रिकृत लक्षणप्रकाशातील अश्वप्रकरणातला पुढील श्लोक उद्धृत करतात.

शालिहोत्रं ऋषिश्रेष्ठं सुश्रुतः परिपृच्छति ।
एवं पृष्टस्तु पुत्रेण शालिहोत्रोऽभ्यभाषत ॥

अर्थ- शालिहोत्र नावाच्या ऋषिश्रेष्ठाला सुश्रुत प्रश्न करतात अशा तह्रेने पुत्राने प्रश्न केल्यावर शालिहोत्र त्याला उत्तर देतात.
सुश्रुत हे एक प्रख्यात शस्त्रवैद्य होते. ती विद्या दिवोदास धन्वंतरीने त्यांना शिकवली होती. दिवोदास हे साक्षात धन्वंतरीचाच अवतार असल्यामुळे लोक दिवोदासांना धन्वंतरीच म्हणत असत. त्यांनीच हे शल्यतंत्र पृथ्वीतलावर प्रथम आणले. पुष्कळ विद्यार्थी धन्वंतरीकडे गेले व ‘आपल्याला शल्यतंत्र शिकवा’ म्हणून विनवते झाले. त्या वेळी धन्वंतरी म्हणाले ‘तुम्हा सर्वांचे प्रतिनिधी म्हणून सुश्रुतानांच मी शल्यतंत्र शिकवीन.’ त्याप्रमाणे सुश्रुतांनी शल्य- तंत्र त्यांच्याच्याकडून आत्मसात केले आणि त्यावर एक ग्रंथ लिहिला. सुश्रुतसंहिता हे त्या ग्रंथाचे नाव होय. सुश्रुतसंहितेचे पाच भाग आहेत. त्या विभागांना स्थाने म्हणतात. सूत्रस्थान, निदानस्थान, शारीरस्थान, चिकित्सास्थान आणि कल्पस्थान अशी त्यांची नावे आहेत. यामधले शारीरस्थान हे महत्वाचे मानतात त्यात वैद्यशिक्षा, औषधमूल विभाग, औषधी चिकित्सा, पत्थ्यापथ्य, विचार इ. सामान्य विषयांचे विवेचन आहे. शस्त्रोपचार आणि व्रणोपचार हा वैद्यकातील अत्यंत महत्वाचा भाग आहे.

सुश्रुताने शंभराहून अधिक पोलादाच्या शल्यशस्त्रांची माहिती दिली आहे .ते म्हणतात या शस्त्रांच्या मुठी आणि जोड मजबूत असावे ती चकचकीत व अतितिक्क्षण प्रकारची असावी ती अतिस्वच्छ असावी व एका मऊ कपड्यात गुंडाळून ठेवावी. या शस्त्रात विविध प्रकारच्या छुरीका, सुऱ्या, चाकू, उत्पाटक, अस्थिछेदक, कात्र्या, सळया, सुया, आकडे, पाश, मूत्रनलिका, उदर, विक्षक, इ. उपकरणे असावी.हाड सांधण्यासाठी बांबूच्या पट्टया वापराव्या, हाड बाहेर ओढणे, आत ओढणे फिरवणे, बाहेरून मालिश नवाने करणे असे प्रकार अस्थिरोगांच्या बाबतीत आवश्यक असतात. व्रणांचे अनेक प्रकार असतात. त्याच्या उपचारपद्धतीही वेगवेगळ्या असतात. मस्तक व चेहरा यांच्यावर जखम झाली तर ती शिवावी. जखमेत लोखंड, लोखंडाचे कण अडकले असता लोहचुंबकाचा उपयोग करावा. सुजेवर लेप आणि पथ्य यांचा प्रयोग करावा.पोटिस बांधावे, शेक द्यावा, शिरांचा वेध करावा, ग्रंथी कापून काढाव्या. जलोदर व वृषणवृद्धी यांच्यावर शलाकेने छेद द्यावा.

मूतखडा काढून टाकण्यासाठीही शस्त्रक्रिया करावी. सुश्रुत हे त्वचारोपण तंत्राचे ही मोठे जाणकार होते हे विशेष होय. मोतिबिंदू काढण्याचीही कला त्यांच्याजवळ होती. ते प्रसूती योग्य मार्गाने होत नसल्यास मूल बाहेर काढण्याचे प्रकारही सुश्रुतांनी सांगितले आहेत. सुश्रुतसंहितेचा उत्तरस्थान नावाचा एक भाग आहे. तो धरून पुढे त्या ग्रंथाला वृद्धसुश्रुत असे म्हणतात. हा भाग कोणीतरी मागाहून जोडलेला असावा. आचार्य भगवद्दत्त म्हणतात सुश्रुतसंहितेचे तीन पाठ असावे. सुश्रुत हा संक्षिप्त पाठ, लघुसुश्रुत हा अतिसंक्षिप्त पाठ आणि वृद्धसुश्रुत हा वाढवलेला पाठ त्या वरील भिन्न भिन्न टीकाकारांनी भिन्न भिन्न पाठ स्वीकारले. कदाचित या पाठाचे त्यांनी मिश्रणही केले असावे.

द्वारकाधीश दिगंबर जोशी
जळगाव
दुरध्वनी 0257-2236815

Leave A Reply

Your email address will not be published.