इंग्लंडचा सलग तिसरा पराभव;  श्रीलंकेने उडवला गतविजेत्यांचा धुव्वा…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

श्रीलंकेने शानदार खेळ करत इंग्लंडचा 8 विकेटने पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली. या सामन्यात संघासाठी गोलंदाज आणि फलंदाज फ्लॉप ठरले. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील इंग्लंडचा हा सलग तिसरा पराभव आहे. त्यामुळे इंग्लंडचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. या दणदणीत पराभवासह इंग्लंडच्या नावावर अनेक लज्जास्पद विक्रम जमा झाले आहेत.

जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिल मलान यांच्यात पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी झाली होती, पण हे दोन खेळाडू बाद होताच इंग्लंडच्या फलंदाजीची दुरवस्था झाली. इंग्लंडकडून बेअरस्टोने 30 आणि मलानने 28 धावा केल्या. जो रूट 3 धावा करून धावबाद झाला. बेन स्टोक्सने नक्कीच काही काळ विकेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला, पण तो मोठी खेळी खेळू शकला नाही आणि 43 धावा करून बाद झाला. शेवटी डेव्हिड विलीने 14 धावांचे योगदान दिले. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 33.2 षटकांत 156 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून लाहिरू कुमारने सर्वाधिक ३ बळी घेतले. याशिवाय कसून रंजिथा आणि अँजेलो मॅथ्यूजने 2-2 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. महेश तिक्षीनाने एक गडी बाद केला. श्रीलंकेसाठी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडच्या फलंदाजांना मोकळेपणाने फटके मारू दिले नाहीत.

छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून पथुम निशांका आणि सदिरा समरविक्रमाने अर्धशतके झळकावली. या खेळाडूंनी नाबाद राहून श्रीलंकेला विजय मिळवून दिला. निशांकने ७७ धावांची तर समरविक्रमाने ६५ धावांची खेळी खेळली. या खेळाडूंनी सहज धावा केल्या आणि श्रीलंकेला विजयापर्यंत नेले. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने २ बळी घेतले.

2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. संघाला सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 1996 च्या विश्वचषकानंतर पहिल्यांदाच इंग्लंडने एका विश्वचषकात सलग तीन सामने गमावले आहेत. आता 27 वर्षांनंतर इंग्लंडने या वाईट विक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. श्रीलंकेने इंग्लंडविरुद्धच्या गेल्या पाच विश्वचषकातील प्रत्येक सामना जिंकला आहे आणि प्रत्येक वेळी इंग्लंडचा पराभव केला आहे.

 

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील शेवटचे पाच विश्वचषक सामने:

2007 – श्रीलंका 2 धावांनी विजयी

2011 – श्रीलंका 10 गडी राखून विजयी

2015 – श्रीलंका 9 गडी राखून विजयी

2019 – श्रीलंका 20 धावांनी विजयी

2023 – श्रीलंका 8 गडी राखून विजयी

Leave A Reply

Your email address will not be published.