३ दिवस उत्खनन तरीही हरवलेले ‘क’ वर्ग प्राप्त सप्तशृंगी मातेचे मंदिर सापडेना !

फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची संतप्त भाविकांची मागणी...

0

 

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी हरवलेले सप्तशृंगी मातेचे ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त मंदिर शोधण्यासाठी तीन दिवस उत्खनन करण्यात आले. मात्र वीस फूट खोल खोदूनही मंदिर हाती लागले नसल्याने अखेर जय सप्तशृंगी माता ट्रस्टचे अध्यक्ष यांनी नवीन मंदिर उभारण्यासाठी भूमिपूजन करून घेतले. दरम्यान भाविकांची फसवणूक करणाऱ्या ट्रस्ट विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त भाविकांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या तीर्थक्षेत्रांना विकास कामांसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्यातर्फे सुरुवातीला ‘क’ वर्ग दर्जा दिला जातो. जशी-जशी भाविकांची संख्या वाढत जाते तसा-तसा संबंधित देवस्थानाचा वर्ग वाढविण्यात येतो. त्या माध्यमातून कोट्यावधी रुपये विकास कामांसाठी शासनातर्फे दिले जातात. परंतु पहुर येथील जय सप्तशृंगी माता निवासिनी ट्रस्टने कोणतेही मंदिर अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रे सादर करून प्रशासनाची दिशाभूल करत ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त करून घेतला. खर तर ‘क’ हा दर्जा मंदिराला मिळतो. परंतू मंदिरच अस्तित्वात नसताना ‘क’ वर्ग मिळाला कसा? असा प्रश्न संतप्त भाविकांना पडला आहे. संबंधित ट्रस्टला ग्रामपंचायतीने जागेचा मालकी हक्क देखील प्रदान केला असून नमुना नंबर ८ ला तशी नोंद करण्यात आली आहे.

जय सप्तशृंगी मा निवासिनी ट्रस्ट चे मंदिर कोठे आहे ?  मंदिरच नाही तर हजारो भाविक आले कसे ? केवळ शासकीय अनुदान लाटण्यासाठीच कागदोपत्री मंदिर उभारून भाविकांची आणि प्रशासनाची देखील दिशाभूल झाली असल्याने संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतप्त भाविक करत आहेत. संबंधित ट्रस्टने तीन दिवस उत्खनन करून देखील मंदिर हाती न लागल्याने नवीन मंदिर उभारणीचा निर्णय घेतला आहे.

नुकतेच विजयादशमीच्या शुभ-पर्वावावर समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल केशव राऊत यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मात्र अद्याप कोणतीही कारवाई संबंधितांवर झालेली नसल्याने भाविकांचा उद्रेक होण्यापूर्वीच प्रशासनाने संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भाविकांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.