१३७ कोटी दंडाच्या नोटीसीमागे राजकारण?

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज प्रकरण सध्या जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. मुक्ताईनगर तालुक्याची सातोड शिवारातील खडकाळ येथील असलेली जमीन एकनाथ खडसे परिवारातील एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे आणि खा. रक्षा खडसे यांचे नावे आहे. खडकाळ जमीन पिकासाठी योग्य नसल्याने त्यातील गौण खनिजाच्या उत्खननाची राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारांनी शासनाच्या रीतसर परवानगीने आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने परवानगी घेतली शासनातर्फे ठरवून दिलेले तेवढे गौण खनिजाचे उत्खनन ठेकेदाराने करावे असा करार झाला होता परंतु ठेकेदाराने शासनाने दिलेल्या परवानगी पेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन केले असल्याचा आरोप ठेकेदारावर झाला आणि हा मुद्दा विद्यमान शिंदे गटाने आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला त्यावर शिंदे फडणवीस सरकारने त्याची दखल घेऊन चौकशी करण्यासाठी एकनाथ एआयटी स्थापन करून त्या मार्फत चौकशी केली तातडीने एसआयटी तर्फे एक पथक प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्याची पाहणी केली या पथकाने दिलेल्या अहवालानुसार चौकशी करून 137 कोटी रुपयांच्या दंड ठरवण्यात आला याबाबत ठेकेदारासह शेतकऱ्यांना 137 कोटी रुपये दंड आकारणीची भरण्याची नोटीस पाठवली आणि पंधरा दिवसाच्या आत या नोटीसीला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले त्यात शेतमालक म्हणून एकनाथ खडसे मंदाकिनी खडसे रोहिणी खडसे आणि खा. रक्षा खडसे यांना देखील नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ठेकेदारालाही दंडाची नोटीस दिली गेली असून जिल्ह्यात खडसे परिवाराला १३७ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस हाच प्रमुख चर्चेचा विषय बनला आहे. माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे म्हणतात, ‘राजकीय सूडबुद्धीने ही नोटीस देण्यात आली आहे’. भाजपच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा. रक्षा खडसे म्हणतात की, “अशी नोटीस देण्यामागे खडसे परिवाराची बदनामी करण्याचा हेतू आहे. एसआयटीने गौण खनिज प्रकरणाची एकतर्फी चौकशी केली आमचे म्हणणे ऐकलेच नाही’. वास्तविक गौण खनिजाचा संबंध ठेकेदाराशी येतो. करारापेक्षा जास्तीचे उद्घाटन केले असेल तर ती ठेकेदाराची जबाबदारी आहे. परंतु ठेकेदाराला सोडून शेतकऱ्याला नोटीस देण्यामागे राजकीय सूड असल्याचे खडसे म्हणतात. त्यांचा रोख मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आहे. परंतु खा. खडसे मात्र कुणावर आरोप न करता सावधगिरीची भूमिका घेऊन, ‘या मागे खडसे परिवाराची बदनामी केली जात आहे’, असा मोघम आरोप करत आहेत. त्यामुळे सासरे आणि सून यांच्या आरोपातील तफावत सहज स्पष्ट दिसून येते. तसे तफावत असणे सहाजिक आहे. कारण रक्षा खडसे भाजपच्या खासदार आहेत. खा. रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सून असल्या, खडसे परिवाराच्या सदस्य असल्या, तरी माझा पक्ष वेगळा आणि नाथाभाऊंचा पक्ष वेगळा, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे १३७ कोटी रुपयांच्या नोटीसीला उत्तर देऊन मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगून सासरे नाथाभाऊंच्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे खडसे परिवारात हा दंडाच्या नोटीसीच्या वादाला वेगळेच वळण लागले आहे.

सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये अशा प्रकारचे वाद नेहमीच होत असतात. एकनाथ खडसे सत्तेत असताना नाथाभाऊ खडसेंकडून माझी बदनामी केली जात आहे, म्हणून चंद्रकांत पाटील ओरडत असायचे. मात्र नाथाभाऊ खडसे विरोधात असल्याने सत्ता पक्षात असलेले आमदार चंद्रकांत पाटील हे नाथाभाऊंचाच कित्ता गिरवतात, असे म्हटले तर त्यात वावगे ठरणार नाही. त्यामुळे राजकीय सत्तेत असलेल्यांना ‘ज्याचे हाती ससा तो पारधी’ अशी उपमा दिली जाते. तशाच प्रकाराचा खेळ सध्या चालू आहे. अशा राजकीय वादामध्ये जनतेला काही एक घेणेदेणे नाही. जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित पडून आहेत. ते विकासाचे प्रश्न सोडवले तर त्यात जिल्हा आणि जिल्ह्यातील जनतेचे भले आहे. तुमच्या राजकीय वाद विवादातून जनतेला काहीही मिळणार नाही. नाथाभाऊ खडसे यांच्यामागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या ससेमीरा लावण्यात आला. त्यातून त्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे आता हे १३७ कोटी रुपयांच्या दंडाचा ससेमीरा लावण्यात येत आहे, हे जनतेलाही कळते. अशा प्रकारामुळे एकनाथ खडसे यांची बदनामी करण्याचा राजकारणाचा हेतू असला तरी नाथाभाऊ आणि खडसे परिवाराला सहानुभूती मिळेल यात शंका नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.