रिकामी फांदी

0

लोकशाही विशेष लेख

 

आता ते झाड तिथं नाहीये. तोडलं असावं कदाचित स्वार्थासाठी… की.. त्या झाडाचीच इच्छा नसावी जगण्याची? कारण; फार कोरडं होतं म्हणे ते झाड, जेव्हा त्याला तोडलं. त्याच्या मूळा अजूनही तिथेच त्या जमिनीत तश्याच पडून आहेत. “कुणाचीच हिंमत नाही झाली त्या मुळा बाहेर काढण्याची” असं काही जाणकार सांगतात. खरंतर कुणाला शक्यच झालं नाही त्या बाहेर काढणं, इतक्या त्या खोल आणि जमिनीला घट्ट धरून होत्या. पण आजूबाजूला ‘ओलावा’ आणि ‘गर्द हिरवळ’ असतांनाही त्याला कधी पुन्हा ‘पालवी’ नाही फुटली हो.. कित्येक वसंत गेले, शरद गेलेत, ग्रीष्म गेलेत. आजूबाजूची ‘हिरवळ’ आणि ‘नवलाई’ सुद्धा त्याचं मन वळवू शकली नाही म्हणे..

एकेकाळी त्या झाडाच्या सावलीत कित्येकांची मनं जुळलीत, फुललीत, बहरलीत, दुखावलीत आणि सुखावलीत सुद्धा. कित्येकांचे संसार सोन्याचे झालेत त्याच्या सावलीत. कित्येक पाखरांनी आपआपले जोडीदार निवडलेत. कित्येक पक्षांच्या पिढ्याच्या पिढ्या त्याच्या फांद्यांवर वास्तव्यास होत्या. कित्येक कडक उन्हाळे, गुलाबी हिवाळे आणि खारट पावसाळेही बघितलेत त्या झाडाने. पण, सध्याचं माणूसपण, नाती, प्रेम असं खुपकाही बदललंय असं त्या झाडाच्या कानावर पडलं आणि त्याला त्याच्याच सौंदर्याची, आधाराची, स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची लाज वाटू लागली असं वाटतं.. माणूस बदलला, माणूसपण बदललं, वर्ष बदलले, महिने बदलले, ऋतू बदलले, ऋतुमती बदलल्या, पुरुष बदलले, पुरुषार्थ बदलले, दिवस बदलले, रात्रीही बदलल्या, घरटी बदलली, पक्षी बदलले अहो एवढंच काय पक्ष्यांचे आवाजही बदललेत. चिमणीचं स्पॅरो, पोपटाचं पॅरट आणि कावळ्याचं क्रो होणं त्याला आवडलं नसावं बहुतेक. जॉनी जॉनी, ट्विंकल ट्विंकल, त्याला रुचलं नसावं कदाचित. कारण चिव चिव ये दाणा खा, कावळा उडाला चिमणी उडाली, नाच रे मोरा असं काही ऐकायची त्याला सवय होती. बरंचकाही बदललंय असं कळल्यावर मग झाडालाही बदलावंस वाटलं.

गेल्या वेळेस बघितलं तेव्हा त्याच्या रिकाम्या फांद्या मनाला फार चटका लावून गेल्या हो. शुष्क, निरस, निस्तेज, विकारी, निष्पर्णी फांद्या. त्या फांद्यांची टोकंच जणू काट्यांच्या रूपाने काळीज घायाळ करत होती. ‘अस्पर्श जाणीवा काय असतात’, याची मला तिथं उभ्या-उभ्या प्रचिती आली. अशात तिचीही आठवण झाली.. कारण त्याच्याच सावलीत आम्हीही विसावा घेतला होता एकेकाळी.. आपसूक डोळे पाणावले. पण, “कुणाच्या जाणिवेने?” हे मात्र आजपर्यंत कळलं नाही. त्या झाडाची काटकता, स्थिरता आणि संयम मी जाणून होतो. मग त्याचाच आदर्श घेत स्वतःला आवरलं; पण त्याची ती रिकामी फांदी सतत काहीतरी वेगळं, विचित्र आणि अघटित होणार असल्याची जाणीव मनाला करून देत होती.

खिन्न मनाने मी तिथून निघालो. लोक म्हणायला लागले होते, झाड म्हातारं झालंय, म्हातारपणातलं आजारपण त्याला जडलय वगैरे वगैरे.. पण ते झाड म्हातारं होणाऱ्यांपैकी नव्हतंच हो. ते ‘एकवेळ वृद्ध होईल पण म्हातारं नाही होणार’ हे मी पक्क जाणून होतो. कारण; परिस्थितीने जे लादलं जातं ते म्हातारपण, मात्र अनुभवातून जे कमावलेलं असते ते वृद्धत्व. अश्या कित्येक शतकांचा वृद्ध अनुभव असलेलं ते झाड आताची वास्तविकता बघून फार दुखावलं गेलं असावं, असं वाटतं. कारण; उगाचच का त्याने निसर्गाची साथ मिळवणं, त्याला प्रतीसद देणं बंद करून हळू हळू मृत्यूला जवळ केलं असेल, आणि हा बदलही इतका संथ होता की कधी त्याचा उभ्या-उभ्या मृत्यू झाला आणि कधी तो जग सोडून माणूसपणाच्या शोधत निघून गेला हे आजूबाजूच्या कुणालाही कळलं नाही..
त्याच्या हळू हळू जाण्यातही ‘आपल्या एकदम जाण्याने दुसऱ्याला दुःख होऊ नये’ हा भाव नक्कीच असणार. कारण कुणाच्या अचानक जाण्याने दुःखी झालेल्या कित्येकांच्या खारट सरी त्याने आपल्या सावलीत कोरड्या होतांना बघीतल्या होत्या.

आता ते तिथं नाहीये. त्याचं अस्तित्व आता संपुष्टात आलंय. पण त्याच्या जाण्याने भलीमोठी आधाराची सावली नाहीशी झाल्याचं दुःख अजूनही कित्येकांना मनात सलत असेल, यात मुळीच शंका नाही. मी मात्र आता त्याच्या मृत्यूची सुरुवात असलेली ती रिकामी फांदी आठवत होतो. ती काळजात टोचत होती. त्याच्या कोंदटलेल्या मनाच्या अस्वस्थतेचा विचार करत डोळे त्याच्या शुष्क फांदीसारखे कोरडे होईस्तोवर अश्रू ढाळत बसण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नव्हता.

राहुल वंदना सुनिल

Leave A Reply

Your email address will not be published.