कापसाची नर्सरी – बियाणे खर्चात बचत

0

 लोकशाही विशेष लेख 

 

लवकरच खरीप हंगाम सुरु होणार आहे. कापूस हे विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada), उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) या भागातील मुख्य पीक आहे. जेव्हापासून बिटी बियाणे उपलब्ध झाले तेव्हापासून बियाण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संकरित वाण आणि त्यात बिटी तंत्रज्ञान यामुळे बियाणे दरवर्षी नवीन घ्यावे लागते. सुधारित बियाण्याप्रमाणे हे बियाणे घरचे वापरल्यास पिकाची वाढ कमी अधिक होणे, वांझ नर झाडे निपजने, उत्पादन कमी येणे यासारखे तोटे अनुभवास येतात. हे टाळण्यासाठी दरवर्षी महागडे बियाणे शेतकरी घेत असतो. कापूस बियाणे (Cotton seed) पेरणी ही टोकण पद्धतीने शेतकरी त्यांच्या शेत जमिनीचा मगदूर पाहून, दरवर्षीचा अनुभव किंवा इतर प्रगतिशील शेतकरी, कृषि तज्ञ यांचा सल्ला घेऊन वेगवेगळ्या अंतरावर करतो. त्यानुसार कमी अधिक बियाणे लागते. बरेच शेतकरी एका ठिकाणी (फुली) दोन बी टोकण करतात. यामागे फुली बाद होऊ नये, कापसाच्या झाडाचा डेरा चांगला होतो असा समज असतो. असे वाटण्यात गैर काहीच नाही. पण या पद्धतीत बियाणे जास्त लागते. बियाण्याचा खर्च वाढतो.
यावर उपाय म्हणजे कापसाची नर्सरी हा होऊ शकतो. हे आपण खालील नर्सरी पद्धतीने करू शकतो.

१) बियाण्याची पिशवी फोडून त्यामधील बियाणे एका मोठ्या वर्तमानपेपर वर घ्या.
२) हातात प्लास्टिक ग्लोज घालून पेपरवरील बियाणे निवडावे. यातील खराब, टोकलेले, आकाराने बारीक, वेडेवाकडे बियाणे बाजूला काढून टाकावे. कारण हे एकतर उगवण होणारे नसते किंवा झाले तर जोमदार न वाढणारे असते. म्हणून याचा काही उपयोग नसतो.
३) चांगल्या टपोऱ्या बियाणेपैकी २ ते ५ टक्के बियाणे बाजूला काढून ठेवावे. उर्वरित बियाणे टोकण करून शेतात लागवड करण्यासाठी वापरावे.
४) टोकण करताना एका फुलीवर एकच बी टोकावे. आपण आधीच खराब बियाणे वेगळे काढून टाकले असल्याने एक बी सुद्धा हमखास उगवण होणारे असेल. झाडाचा डेरा चांगला होण्यासाठी चारही बाजूला चांगले अंतर, सूर्यप्रकाश व मोकळी खेळती हवा, जमिनीचा वापसा या गोष्टी कामाच्या असतात.
५) आता याच वेळी जे २ ते ५ टक्के चांगले बियाणे वेगळे काढून ठेवलेले असेल ते नर्सरी तयार करण्यासाठी वापरावे. मार्केटमध्ये प्लास्टिकचे ग्लास मिळतात. त्यामध्ये शेतातील माती भरून शेतात झाडाखाली मांडून ठेवावे. या प्रत्येक ग्लासमध्ये एक एक बी टोकावे. त्यांना शेतातील पिकास दिले जाते त्याप्रमाणेच पाणी द्यावे. झारीने पाणी दिल्यास उत्तम. यामुळे आपणास बियाण्याची उगवण शक्ती देखील कळू शकते.
६) शेतात ज्या दिवशी बियाणे टोकण केले त्याच दिवशी या प्लास्टिक ग्लासमध्ये देखील बी टाकले असल्याने दोन्ही रोपांचे वय सारखेच असेल. ज्या ठिकाणी फुली बाद झाली याची खात्री झाली की त्या ठिकाणी हे नर्सरी मधील रोप लावता येईल. सारख्या वयाचे रोप लावल्याने पुढे सगळी झाडे सारखीच वाढतील. उत्पन्नात फरक पडणार नाही.
७) एका फुलीवर एक बी टोकण केल्याने एका बॅगमध्ये जास्त क्षेत्र लागवड होईल. पर्यायाने बियाणे खर्चात बचत होईल. गुलाबी बोंड अळी प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषि विभागाच्या सुचनेप्रमाणे १ जून नंतरच कापूस लागवड करावी.
हे तंत्र काही शेतकऱ्यांनी त्याच्या शेतावर उपयोगात आणलं आहे. त्यांच्या अनुभवातून निर्माण झालेल्या या तंत्राचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.

ज्ञानेश्वर शिंपी
कृषि अधिकारी पंचायत समिती, चोपडा

Leave A Reply

Your email address will not be published.