विद्राव्य खते: पिकांसाठी पोषक नवसंजीवनी

0

लोकशाही विशेष लेख 

भारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील अन्नधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता कमी असण्याच्या मुख्य कारणांमध्ये आपल्याकडील बदलते हवामान कमी झालेली जमिनीची सुपिकता, खत (Fertilizer) आणि पाण्याच्या नियोजनाचा अभाव यांचा प्रामुख्याने समावेश होतो. आधुनिक शेतीमध्ये सुधारित-संस्कारित बियाण्याचा वापर, माती परिक्षणानुसार एकात्मिक अन्नद्रव्याचा वापर, ठिबक/तुषार माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर, पीक संरक्षण आणि बदलत्या हवामानानुसार आपत्कालीन पीक नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास निश्चित अधिक दर्जेदार उत्पादन मिळू शकते. महाराष्ट्रात फक्त १८ टक्के क्षेत्र बागायती खाली असल्याने, कोरडवाहू क्षेत्रामधूनच अधिकाधिक उत्पादन काढणे महत्त्वाचे ठरते तेव्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम खूपच महत्त्वपूर्ण असतो.

मागील दोन ते तीन वर्षातील दुष्काळ, अतिवृष्ठी, गारपीट आणि अवकाळी पाऊस व इतर नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हैराण झाला आहे. ज्या ठिकाणी शेती केवळ पावसावर अवलंबून आहे आणि सिंचन सुविधा नाही अशा परिस्थितीत, बुडत्याला काठीचा आधार म्हणून जमिनीतील पिकांच्या मूळाच्या खालील थोडीफार ओल उचलून घेण्याची ताकद पिकांना येण्यासाठी, पिकांना प्रथम सशक्त करणे गरजेचे आहे. पिकांना पानावाटे पोषक आहार देऊन, मूळाची ताकद वाढवून ती अधिक खोलवर नेऊन, जमिनीतील ओलावा खेचून वाढ करून घेता येते. त्यासाठी सर्व पिकांना वाढीच्या अवस्थेनुसार ०.५ ते १ टक्के नत्र, स्फूरद व पालाशयुक्त खते ५० ते १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात विरघळवून पानावाटे देणे अतिशय गरजेचे आहे. एकरी १५० ते २०० लिटर पाणी लागते. त्यासाठी बाजारात अनेक विद्राव्य खते उपलब्ध आहेत.

विद्राव्य खतांचे प्रकार –

१) १९:१९:१९- वाढीच्या अवस्थेत.
२) १२:६१:०० व कॅल्शिअम नायट्रेट -फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना (वेगवेगळी द्यावीत)
३) ००:५२:३४ व १३:४०:१३ -फलोरा ते फळ धारणेच्या अवस्थेत (वेगवेगळी द्यावीत)
४) १३:००४५ व ००:००:५० -फळ वाढीच्या अवस्थेत अशताना (वेगवेगळी द्यावीत)

पाऊस जरी कमी जास्त झाला तरी पिकांना आधार देण्याचे कार्य ही खते करणार आहेत.वरील सर्व खतांचे प्रमाण ०.५ ते १.० % प्रमाणे ठेवावा. (५० ते १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फवारणी सकाळी तसेच संध्याकाळी वाऱ्याचा वेग व कमी सूर्यप्रकाश असताना करावी. ८बऱ्याचदा अन्नद्रव्यांची पिकांना उपलब्धता ही जमिनीचे तापमान, ओलावा, हवामानातील बदल, सामू, चूनखडीचे प्रमाणे, सेंद्रिय कर्ब इत्यादी बाबींवर अवलंबून असते. अशा प्रतिकूल परिस्थितीत पिकांवरील पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा ताण हा पीक पोषणावर व वाढीवर अनिष्ट परिणाम करीत असतो. एखाद्या आजारी माणसाला सलाईन वाटे टॉनिक देऊन त्याचा थकवा, अशक्तपणा कमी केला जातो त्याचप्रमाणे, पिकाची वाढ मर्यादित कालावधी मध्ये कमी झाली असेल तर त्यास आधार देण्यासाठी आणि तग धरून ठेवण्यासाठी, थोडेसे टॉनिक म्हणून अन्न व पाणी पिकांना, पानावाटे देणे अति महत्त्वाचे आहे. त्यामुळे बदलत्या हवामानात पीक तग धरून वाढत राहते. पिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढते व पीक कीड व रोगास कमी बळी पडते व अधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. केवळ एक फवारणी करून चालणार नाही तर वेळप्रसंगी १५-२५ दिवसांनी पिकांच्या वाढीनुसार, खतामधील मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण गरजेचे आहे. फवारणीद्वारे देण्यात येणाऱ्या खतांचे प्रमाण कमी असल्याने खर्च कमी येतो व ती आधिक फायदेशीर ठरतात शिवाय अशा संक्रमण परिस्थितीतून निभावून नेण्यासाठी, विद्राव्य खतांचा वापर करणे हितावह ठरते. त्यांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी द्रावणामध्ये स्टीकर वापरतात. खते पानावर विस्तारून चिकटून जास्त वेळ राहिल्या, पानावाटे अन्नद्रव्ये शोषून घेण्यास मदत होते.

 

परेश दिलीप पालीवाल
संचालक, श्री नाटेश्र्वर कृषी सेवा केंद्र, लासूर
मो. ८३७८०९६३०३

 

Leave A Reply

Your email address will not be published.