मतांसाठी उमेदवारांची पराकोटीची पराकाष्टा

0

लोकशाही विशेष लेख

 

निवडणूक म्हटलं की, आपल्या समोर एक भलतच चित्र समोर दिसू लागतं… त्यात रखडलेल्या कामांना, खुंटलेल्या विकासाला चालना, जनसंपर्क आदी कार्य युद्धपातळीवर सुरु होतात. सर्वस्तरात चर्चा आणि चर्चेला सर्वत्र पुरेपूर वेळ अगदी नाक्यावरच्या ठेक्यापासून ते टपरीवरच्या कट्ट्यापर्यंत सर्वांनाच मिळतो. जो तो आपापल्या परीने सर्वज्ञानी होऊन अगदी मुद्देसूद विश्लेषणही करू पाहतो. मग तो अगदी सामन्यातील सामान्य असो की बलाढ्य, धनदांडगा असो. आणि यावेळी उमेदवार असो की त्यांच्या आजूबाजूचा ‘सो कॉल्ड’ अतिमहत्वाचा ‘तो एक’ आणि प्रत्येकजण हा अगदी इमाने इतबारे आपल्या कर्तव्यांची पुरती करतांना दिसतो. मग त्यात मतदारांशी प्रत्यक्ष भेट किंवा दूरध्वनी वरून संपर्क असो; यात ‘तो एक’ तर अगदी तत्पर दिसून येतो. त्याला कसला स्वार्थ असतो, हा एकतर त्यालाच माहित असतो, किंवा त्याला जबाबदारी देणाऱ्या त्याच्या नेत्यालाच माहित असतो. लोकशाहीने ठराविक वयात येणाऱ्या प्रत्येकांना मतदार म्हणून हक्क आणि अधिकार दिला आहे. त्या अधिकाराला त्या दात्याने अगदी चपखलपणे उमेदवाराला सर्वच बाबींमध्ये तावून सुलाखूनच आपलं बहुमूल्य मत देणं हे त्याच्या स्वतःसाठी आणि त्याच्या भविष्यासाठीही तितकच महत्वाचे असतं. त्यामुळे कुठल्याही प्रलोभनांना, व्यक्ती विशेष पाहून, पक्ष, धर्म, जात या गोष्टींना अगदी मुळासकट उपटून फेकून आपल्या सत्सद्विवेक बुद्धीचा वापर करूनच आपलं मत द्यावं. अन्यथा पुढील पाच वर्षे मग पुन्हा त्याच कट्यांवर दुर्लक्षित झाल्याची, थांबलेल्या विकासाच्या आणि नानाविध परिस्थितीवर चर्चा करून काहीही उपयोगाचे ते ठरणार नाहीच.

यावेळी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही व्यक्ती निरीक्षणाच्या अव्वलस्थानी असणे कधीही फायद्याचेच, तद्नंतर त्याची सामाजिक स्थिती, कार्यक्षमता किती यामुळे त्याची प्रगल्भता लक्षात येतेच. त्याचं आपल्या माणसांविषयी आपुलकीभाव किती कि फक्त सार काही निवडणूक आली म्हणून दिखावा आहे हे आपण मतदार म्हणून पडताळून पाहणे गरजेचे. नाहीतर निवडणुकीच्या वेळीच ही मांडली पावसाळ्यातील बेडकांप्रमाणेच बाहेर येतात, ते आणि त्यांच्या आजूबाजूचे मांडली गोडगोड बोलतात आणि आपलेपण दाखवतात. त्यानंतर काय मनस्ताप होतो हे नव्याने सांगण्याची मतदार राजाला गरज नको.
सध्या सर्वत्र निवडणुकीचे वातावर जोर धरतांना दिसत आहे. या वर्षाच्या समाप्तीच्या वेळीही शहरात निवडणुकीचे जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच अजून छोट्यामोठ्या काहींशी निवडणुका ह्या सुरूच आहे. त्याचा प्रचारही सुरु आहे, त्यामुळे आपलं आधी मनाशी एकमत होणं गरजेच आहे. की आपण योग्य त्या व्यक्तीलाच मत देत आहोत का? की यामुळे मला व माझ्यासह अनेकांना याची झळ पोहोचेल.
मतदार राजा जागा हो… लोकशाहीचा धागा हो…

 

आकाश जनार्दन बाविस्कर
जळगाव
९६७३३०३०५७

Leave A Reply

Your email address will not be published.