चंपई सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यामंत्री पदाची शपथ

0

रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार व आदिवासी नेते चंपई सोरेन यांनी शुक्रवारी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर आलम, राजद नेते सत्यानंद भोक्ता यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ सोहळा पार पडताच सत्ताधारी आघाडीच्या ३९ आमदारांना हैदराबादला हलवण्यात आले. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना शुक्रवारी न्यायालयाने ५ दिवसांसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत पाठवले.

जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने बुधवारी हेमंत सोरेन यांची चौकशी केल्यानंतर अटक केली होती. त्यामुळे हेमंत सोरेन यांनी राजीनामा देत पक्षाचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन यांच्याकडे सूत्रे सोपवली. चंपई सोरेन यांनी गुरुवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तेचा दावा केला. राज्यपालांनी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता राजभवनातीलदरबार हॉलमध्ये सोरेन यांना शपथ दिली.

ते राज्याचे १२ वे मुख्यमंत्री आहेत. चंपई यापूर्वी हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राजदच्या एका आमदाराने देखील शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चंपई सोरेन यांनी झारखंडच्या विकासासाठी कटिबद्धता व्यक्त करत हेमंत सोरेन यांनी सुरू केलेल्या कल्याणकारी योजना आपले सरकार सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.राज्यपालांनी नव्या मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. परंतु आपले सरकार ५ फेब्रुवारी रोजी बहुमत सिद्ध करणार असल्याचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांनी सांगितले. तत्पूर्वी घोडेबाजार टाळण्यासाठी शपथविधी होताच सत्ताधारी आघाडीच्या ३९ आमदारांना चार्टर्ड

विमानाने हैदराबादला पाठवण्यात आले. आता सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणीवेळीच हे आमदार हैदराबादवरून येतील. भाजप आमचे आमदार फोडू शकतो म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. तत्पूर्वी चंपई सोरेन यांनी एक व्हिडिओ सार्वजनिक करत आपल्यासोबत ४३ आमदार असल्याचे दाखवले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.