जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर, भोंदू बाबाने पळवले १८ लाख रुपये

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

सुसंस्कृत पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांचं पाऊस पाडतो म्हणून एका भोंदू बाबाने तरुणाचे १८ लाख रुपये पळवल्याचे समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये बनावट पोलिसांचा देखील समावेश होता. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पुण्याच्या हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात पैशांचा पाऊस पडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडतो असे सांगत एका तरुणाचे १८ लाख रुपये पळवणारा बाबा आईरा शॉब याच्यासह माधुरी मोरे, रॉकी वैद्य, आणि किशोर पंडागळे या चार जणांवर पुण्यातील हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विनोद छोटेलाल परदेशी यांना त्यांच्या मित्रामार्फत पैशाचा पाऊस पडतो सांगत एक अघोरी पूजा मांडायला सांगितले. या पूजेसाठी १८ लाख रुपये रोख तिथे आणण्यात आले होते. मात्र तिथे आधीच आरोपींनी विनोद छोटेलाल परदेशी यांना फसवण्याचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे आरोपींनी रोख रकमेसह पूजा सुरु केली. मात्र पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही बनावट पोलीस आले. त्यांनी बाबासह तरुणाला मारहाण करत त्या ठिकाणी असलेले १८ लाख रुपये घेऊन पळ काढला. त्यानंतर विनोद परदेशी यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आता या भोंदू बाबासह तिघांचा शोध पोलीस घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.