लोकशाही न्यूज नेटवर्क
अहमदनगर
कोपरगाव : शेतातील शेततळ्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव शिवारातील रावसाहेब शिंदे यांच्या शेतात मंगळवारी ( दि.८) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. पूजा नीलेश शिंदे (वय २३), नीलेश रावसाहेब शिंदे (वय २६) असे मृत झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
वीजपुरवठा सुरू नसल्याने पूजा व तिचा पती नीलेश हे पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेले होते. याच दरम्यान पाणी भरताना पाय घसरून नीलेश शेततळ्यात पडला.
त्याच्या पाठोपाठ त्याला वाचवण्यासाठी पूजाने पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी बुधवारी (दि.९) दिली.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले व ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना शेततळ्याबाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नीलेश हा उच्चशिक्षित होता व वर्षभरापूर्वीच त्याचा पूजा हिच्याशी विवाह झाला होता. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अंचलगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.