कास तलावाच्‍या भिंती उंच केल्यामुळे यंदा तुडुंब भरणार तलाव

0

सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

सातारा (Satara) शहराला पूर्वापार कास तलावातून पाणीपुरवठा करण्‍यात येत आहे. उघड्या पाटातून येणारे पाणी नंतरच्‍या काळात बंदिस्‍त वाहिनीतून साताऱ्यात आणण्‍यात येऊ लागले. वाढणारी लोकसंख्‍या नजरेसमोर ठेवत या तलावाच्‍या भिंतीची उंची वाढविण्‍याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्‍प पालिकेने हाती घेतला होता. सातारा शहराचा जलदाता असणाऱ्या कास तलावाच्‍या भिंतीची उंची वाढविण्‍याचे काम अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. हे काम येत्‍या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्‍याचा चंग बांधण्‍यात आला असून, त्‍यानंतर पडणाऱ्या पावसाचा थेंब याठिकाणी साठला जाणार आहे. नवीन भिंतीमुळे या ठिकाणचा पाणीसाठा अर्धा टीएमसी इतका होऊन तलाव तुडूंब भरणार आहे.

नवीन भिंत बांधण्यापूर्वी असणाऱ्या भिंतीमुळे त्‍याठिकाणी ०.१ टीएमसी इतका साठा होत होता. नवीन कामादरम्‍यान जुन्‍या भिंतीपेक्षा १२ मीटर उंच असणारी भिंत बांधण्‍यात आली असून, त्‍यामुळे तेथील पाणीसाठा अर्धा टीएमसी इतका होणार आहे. वाढणाऱ्या पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर व्‍हावा, तसेच त्‍याठिकाणाहून येणाऱ्या पाण्‍याची आवक वाढावी, यासाठी जलवाहिनी बळकटीकरणाचे काम देखील आगामी काळात पालिकेच्‍या वतीने हाती घेण्‍यात येणार आहे. सद्यःस्‍थितीत तेथील काम अंतिम टप्‍प्‍यात असून, हे काम येत्‍या सात जूनपूर्वी पूर्ण करण्‍यासाठी सर्व यंत्रणा त्‍याठिकाणी कार्यरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.