तुमची ‘नमोनिर्माण सेना’ का झाली ?

राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

0

मुंबई, लोकशाही  न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिल्लीत अशी कोणती फाइल दाखवली की त्यांनी मुंबई येऊन थेट भाजपाला समर्थन जाहीर केले? असा सवाल उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी मंगळवारी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

ते काही काळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना महाराष्ट्राचे शत्रू आहेत असे सांगत होते. महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देऊ नका, ते महाराष्ट्राचे दुश्मन आहेत त्यांना राज्यात पाऊल ठेऊ देऊ नका असे आवाहन जनतेला करत होते. आता अचानक असा हा कोणता चमत्कार, साक्षात्कार झाला हे तुम्ही त्यांना जाऊन विचारले पाहिजे. असे काय झाले की तुम्ही अचानक पलटी मारुन महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत आहात. जनतेला काय उत्तर देणार? यामागील कोणते कारण आहे? कोणती फाइल उघडली आहे? कोणती फाईल तुम्हाला दाखवली की मुंबईत आल्यानंतर तुम्ही थेट त्यांना समर्थन जाहीर केले, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, बरे झाले उघड समर्थन दिले. नाहीतर उमेदवार उभे करा, मते खा हे राजकारण चांगले नाही, असेही म्हटले.

नमोनिर्माण सेना ?

संजय राऊत यांनी मनसेचा नमोनिर्माण सेना पक्ष का झाला असा खोचक सवालही विचारला. त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांपासून जी लूट सुरु आहे. महाराष्ट्रात जे अत्यंत घाणेरडे खोक्याचे राजकारण सुरु आहे. या साऱ्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. महाराष्ट्रातून उद्योग पळवला जातो, मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतो, मुंबईला विकलांग करण्याचा प्रयत्न सर्वांना माहिती आहे. अशावेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. त्याची उत्तरे तुम्हीच द्यायची आहेत. तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला ?

Leave A Reply

Your email address will not be published.