१९ वर्षीय युवकाने केला २१ वर्षीय युवतीचा खून…

0

 

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

सांगलीतील जत येथून एक धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे. येथे प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीचा १९ वर्षीय युवकाने खून केल्याची घटना घडली आहे. अक्षता सदाशिव कोरे (२१), रा. सैनिकनगर, जत या युवतीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असलेल्या पडीत जागेत अक्षताचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी जत पोलिसांनी संशयित युवकाला निखिल नामदेव कांबळे (१९), रा. शिवाजी पेठ, जत याला ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जत येथील राजे रामराव महाविद्यालयात अक्षता शिक्षण घेत होती. तिचे वडील कापड व्यापारी आहेत. सोमवारी सकाळी वडिलांनी तिला महाविद्यालयात सोडले मात्र, दुपारी तीन वाजे पर्यंत अक्षता घरी आली नाही. म्हणून नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला होता. दरम्यान, महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडक्या इमारतीत काही गुराख्यांना मुलीचा मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली. खुनाची घटना दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. अक्षताचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पंचनाम्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून अक्षताचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. मृत अक्षताचा भाऊ सागर सदाशिव कोरे यांनी फिर्याद दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.