जिल्हाधिकाऱ्यांची आज पहाटेपासूनच वाळू माफियांवर धडक कारवाई !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरापासून जवळच असलेल्या गिरणा नदीपात्रात सकाळीच महसूल व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत वाळू तस्करांना जोरदार झटका देण्यात आला असून, वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर्स व डंपर जप्त केले आहे. सध्या वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून, वाळूचोरांपुढे प्रशासन अगदी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात तर वाळू तस्कर मोकाट सुटले होते. त्यांच्या बदलीनंतर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतलेले जिल्हाधिकारी ‘आयुष प्रसाद’ (Ayush Prasad) यांनी वाळू तस्करीला आळा घालणे ही आपली प्राथमिकता असेल असे सांगितले होते. यानुसार मध्यंतरी काही प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. मात्र रात्रीपासून वाळू तस्करांच्या विरोधात मोठी मोहिम राबविण्यात आली आहे.

आज पहाटे दोन वाजेपासून नाशिक येथील महसूल खात्याचे पथक हे स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनासह थेट गिरणा नदीच्या पात्रात उतरले. यासोबत हे पथक गिरणा पात्राला लागूनच असलेल्या बांभोरी गावात दाखल झाले आहे. या पथकाने नदीपात्रासह गावात उभे असलेले ट्रॅक्टर्स आणि डंपर्स जप्त केले. जवळपास १०० पेक्षा जास्त वाहने जप्त करून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर सकाळपासूनच बांभोरी गावासह परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. या संदर्भात प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.