चाळीसगावातील गॅंगवॉरला वेळेत ठेचून काढा

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

अवघ्या दोन महिन्यात खून, खुनाचा प्रयत्न, अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि भर दिवसा गजबजलेल्या वस्तीत माजी नगरसेवकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी चाळीसगाव शहर हादरले आहे. शांत असलेल्या चाळीसगाव शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढत आहे. बुधवारी माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्या कार्यालयावर दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास एका कारमधून चार हल्लेखोरांनी येऊन कार्यालयात बसलेल्या महेंद्र मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चाळीसगाव प्राथमिक उपचारानंतर त्यांना नाशिकला हलवण्यात आले आहे. हल्लेखोर गोळीबार करून सहीसलामत कारमधून पसर झाले आहेत. या घटनेत चाळीसगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने जळगावहून जादा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. त्यापूर्वी दोन महिन्यापूर्वीच पोलीस खात्यात नोकरीला असलेल्या तरुण शुभम आगोणे याचा क्रिकेटचा वातातून एका गटाने खून केला. हे प्रकरण क्षमते न क्षमते तोच बुधवारच्या गोळीबार घटनेने गुन्हेगारी प्रवृत्तीने आपली झलक दाखवून दिली. माजी नगरसेवक महेंद्र मोरे हे सत्ताधारी भाजपचे सदस्य होते. महेंद्र मोरे यांचे अवैध धंदे असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. एका वर्षापूर्वी म्हणजे १४ जानेवारी २०२३ रोजी सुमित भोसले यांच्या गटातील एकाचा खुनाचा खून झाला होता. त्या खुनाच्या गटात महेंद्र मोरे यांचा हात असल्याचे बोलले जाते. त्या खुणाचा बदला एक वर्षाच्या आत आम्ही घेऊ असा निर्धार प्रतिस्पर्धी गटाने केला होता, असे म्हटले जात आहे. १४ जानेवारी २०२४ लाच महेंद्र मोरे यांच्यावर हल्ला होणार होता, परंतु तो प्रयत्न फसला आणि बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी तो बदला घेतला गेला, असे म्हणतात. परंतु त्यात महेंद्र मोरे यांचा मृत्यू होण्याऐवजी ते गंभीर जखमी झाले. ही खंत हल्लेखोर गटाची असल्याचे बोलले जातेय. म्हणजे ‘खून का बदला खून से’ या मुक्ती प्रमाणे महेंद्र मोरे यांना संपवायचे होते. सांघिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रकाराने थरकाप उडतो एवढे मात्र निश्चित. एका वर्षांपूर्वी झालेल्या सुमित भोसलेच्या गटातील एका व्यक्तीच्या खुनाच्या आधी सध्या गोळीबारात जखमी झालेल्या माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्या मुलावर हल्ला झाला होता असे म्हणतात. महेंद्र मोरे यांच्या मुलावरील हल्ल्याचा बदला म्हणजे सुमित भोसलेच्या गटातील एकाचा खून असल्याचे बोलले जाते. त्यातूनच पूर्व वैमान्यातून माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळी झाडली, असे चाळीसगावात सर्वत्र बोलले जात आहे. तेव्हा पोलिसांनी या सर्व प्रकारची माहिती नव्हती, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या गुंडांना फावले आणि त्यांनी कार मध्ये भर दिवसा जाऊन कार्यालयात गोळीबार केला. असे म्हटले जाते की पाचही हल्लेखोरांकडे गावठी कट्टे होते. हे गावठी कट्टे आले कुठून? याचा शोध सुद्धा पोलिसांनी लावणे आवश्यक आहे. माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांची पार्श्वभूमी तपासण्याची गरज आहे. कारण आपल्या संरक्षणार्थ सत्ताधारी भाजप पक्षाचे कवच कुंडले हे लोक वापरतात त्यामुळे पोलीस प्रशासनाची फार मोठी पंचायत होते. त्यामुळे चाळीसगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा येत असेल तर पोलिसांनी खडक अंमलबजावणी केली पाहिजे.

पोलीस दलात सेवेत असलेल्या शुभम आगोणे याच्या प्रकरणाचा फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याचा लवकरात लवकर निकाल लावून हल्लेखोरांना सजा सुनावण्यात येईल, असे आश्वासन शुभम आगोणे यांच्या नातेवाईकांना आणि त्याच्या समाज बांधवांना आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकतेच दिले. त्या दृष्टीने हालचालीही सुरू झाल्या. परंतु त्यानंतर ही गोळीबाराची दुसरी घटना चाळीसगाव शहरात झाल्याने शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत असल्याने आमदार मंगेश चव्हाण यांची डोकेदुखी वाढली आहे. आगामी काळात चाळीसगाव शहरात गुन्हेगारी वाढणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पोलिसांच्या सहकार्याने मंगेश चव्हाण यांनी शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. आमदार मंगेश चव्हाण सक्षम असून ते शहरातील शांतता प्रस्थापित करतील, परंतु पोलिसांनी या गोळीबार प्रकरणातील आरोपींचा तातडीने शोध लावून त्यांना अटक करून पुढील कारवाई करावी. शेवटचे वृत्त हाती आले त्यावेळी महेंद्र मोरे यांच्या कार्यालयातील एकाच्या फिर्यादीनुसार सात संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.