धक्कादायक : साक्रीत सशस्त्र दरोडा; २३ वर्षीय तरुणीचे केले अपहरण

0

अपह्यत तरुणी सापडली सेंधव्यात ; ८८ हजारांचे दागिने लुटले ; जिल्ह्यात खळबळ ; तपासासाठी सात पथके

साक्री : – शहरातील नवापूर रस्त्यावरील भाडणे शिवारात असलेल्या सरस्वती कॉलनीत सशस्त्र दरोडा पडला. अंदाजे ३५ वयोगटातील चार ते पाच दरोडेखोरांनी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून महिलेला मारहाण करुन ओढणीने बांधुन ठेवले व ८८ हजार ५०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लुटून नेतांना २३ वर्षीय तरुणीचे अपहरण केले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. तसेच गुन्ह्याच्या तपासासाठी सात पथके नेमण्यात आली आहेत..दरम्यान दरोडेखोरांनी अपहरण केलेली युवती धुळे पोलिसांच्या एका पथकाला रात्री उशिरा मध्य प्रदेशातील सेंधवा येथे आढळून आली. पोलिसांनी मोबाइलच्या आधारे आरोपींचा पाठलाग सुरू केला होता. त्या दृष्टीने पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले होते. त्यातच संबंधित युवती मिळवून आल्याने तपास पथकाला दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भात, शहरातील नवापूर रस्त्यावरील भाडणे शिवारात सरस्वती नगरात राहणाऱ्या ज्योत्स्ना निलेश पाटील (४०) व त्यांची भाची निशा मोठाभाऊ शेवाळे (२३) या दोघी दि.२५ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घरात टीव्ही पाहत असतांना घराचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. त्यामुळे निशा शेवाळे हिने तिच्या आत्याला सांगितले की, मामा आले वाटतं म्हणून ज्योत्स्ना पाटील यांनी दार उघडले असता अंदाजे ३५ वयोगटातील तोंडाला मास्क लावलेले, अंगात काळ्या रंगाचा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट व पायात काळे बुट असलेले अज्ञात चार ते पाच दरोडेखोर घरात शिरले.

दरोडेखोरांपैकी एकाने ज्योत्स्ना पाटील यांना मारहाण करीत नाक व तोंड दाबून त्यांना पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून हिंदीतून सोना, चांदी कहा पर रखा है! अशी विचारणा केली. तेव्हा ज्योत्स्ना पाटील यांनी कपाटाकडे बोट दाखवले. दरोडेखोरांनी कपाटातून तसेच ज्योत्स्ना पाटील यांच्या अंगावरील सुमारे ८८ हजार ५०० रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने ओरबाडले. तसेच ज्योत्स्ना पाटील यांचे हात पाय व तोंड ओढणीने बांधुन घराची कडी बाहेरुन लावून घेत त्यांना आत कोंबले आणि निशा शेवाळे हिला जबरीने अपहरण करून सोबत घेऊन गेले. .

या घटनेत दरोडेखोरांनी ६० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ, १४ हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ हजाराच्या अंगठ्या, ६ हजाराचे कानातील काप, ३ हजार ५०० रुपये किमतीचे चांदीचे पैंजन असा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी ज्योत्स्ना पाटील यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांविरुध्द भादंवी कलम ३९५, ३६४, ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक साजन सोनवणे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन नाकाबंदी करण्यात आली.

काल (दि.२६) सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी एलसीबीचे तीन व साक्री पोलीस ठाण्याचे चार अशी सात पथके वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी. पारधी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.