साकळी ग्रामपंचायतीत नामप्र (इमाव) संवर्गातील सरपंच होणार

0

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

साकळी येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांचे वेध लागलेले असून साकळी गावाच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे सुद्धा लक्ष लागणार आहे. जानेवारी २०२३ अखेरीस पासून निवडणूक कार्यक्रमास सुरुवात झालेली असून निवडणुकीत गावातील सहा वार्डातुन एकूण १७ ग्रामपंचायत सदस्यांसह संपूर्ण गावातून लोकनियुक्त सरपंच निवडला जाणार आहे. महिला आरक्षणानुसार १७ सदस्यांपैकी पैकी निम्मे सदस्य महिला असणार आहे. तसेच आरक्षणानुसार सरपंच पद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गा (इमाव) साठी राखीव आहे. गावातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता सदर निवडणूक ही अतिशय लक्षवेधी व चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.

सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी होणाऱ्या साकळी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम ३० जानेवारी २०२३ पासून सुरुवात झालेला असून १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत वार्ड रचना बाबत कार्यवाही पूर्ण करून वार्ड रचना जाहीर करून सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार आहे. दि.१७ ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान वार्ड रचनेवर हरकती मागवल्या जातील. त्यानंतर आलेल्या हरकतींबाबत निपटारा करून अंतिम वार्ड रचना जाहीर करण्यात येईल.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम वार्ड रचना जाहीर झाल्यानंतर नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी व ग्रामसेवक यांनी एक दिवस विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यात सोडत पद्धतीने राखीव जागांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. वार्ड रचना तयार करण्याच्या कामासाठी साकळी गावासाठी यावल पंचायत समिती विस्तार कृषी अधिकारी ई. के. चौधरी यांची पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली असून त्यांना साकळीचे तलाठी व्ही. एस. वानखेडे सहकार्य करणार आहे. एकूणच निवडणुकीपूर्वीचा कार्यक्रम पाहता साधारणतः मे महिन्यात निवडणुक होण्याचा अंदाज आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने साकळीचे राजकारण दिवसेंदिवस चांगलेच तापत आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी गावातील विविध राजकीय चेहरे तयारीला लागलेले असल्याचे दिसून येत आहे. या सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या भावी उमेदवारांनी गावातील लोकांशी वेगवेगळ्या माध्यमातून जनसंपर्क वाढवलेला आहे. सरपंच पदासाठी गावातून अनेक नावे चर्चेत आहे. यात प्रामुख्याने माजी ग्रा. पं. सदस्य दिपक पाटील, विकासोचे संचालक श्याम महाजन, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी, अरविंद निळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी, मनोज (मनू) निळे, भाजपाचे जनार्दन (बापू)सांळूखे, नितिन फन्नाटे, भाजयुमोचे जिल्हा कार्य सदस्य विलास पवार, भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष आकाश रविंद्र पाटील, महेंद्र बडगुजर यांचे नावे चर्चेत असून मुस्लिम समाजातून सुद्धा सरपंचपदासाठी एक- दोन जणांची नावे चर्चेत आहे.

तर वेळप्रसंगी सरपंच पदासाठी महिलाही असू शकतात. तसेच ग्रा.पं. सदस्य पदासाठी विद्यमान सदस्यांसह अजून नविन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात येऊ शकतात. या निवडणुकीत दोन ते तीन पॅनल एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून येण्याची शक्यता आहे. हे पॅनल गावातील मातब्बर राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली असणार आहे.

या निवडणुकीत गावाच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा गाजणार असून प्रस्थापितांसाठी ही निवडणूक अग्निपरीक्षाच ठरणार आहे. मागील काळात गावावर भाजप प्रणित पॅनलची एकहाती सत्ता होती. जि.प. सदस्य व पं.स. सदस्य हे दोघं पदे सुद्धा भाजपाकडे होती. त्यामुळे भाजप प्रणित पॅनलकडून गावाची सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न होऊ शकतात. तसेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी सुद्धा घडू शकतात. एकूणच निवडणुकीचा राजरंग गावकऱ्यांसाठी कट्ट्यावरी चर्चेचा विषय बनणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.