तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी ए. रेवंथ रेड्डी विराजमान

0

उपमुख्यमंत्र्यांसह ११ मंत्र्यांनी घेतली शपथ; काँग्रेस अध्यक्ष खरगे, सोनिया व राहुल गांधी उपस्थित

हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह दणदणीत विजय मिळवल्यानंतर विधिमंडळ दलाचे नेते अनुमुला रेवंथ रेड्डी गुरुवारी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राज्यपाल तमिलीसाई सौंदरराजन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत ११ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात सहा वेळा आमदार व एकदा मंत्री राहिलेले मल्लू भट्टी विक्रमार्क यांना यंदा उपमुख्यमंत्री बनवण्यात आलेआहे. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित होत्या.

तेलंगणाची राजधानी हैदराबाद स्थित एल. बी. मैदानावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून ५६ वर्षीय ए. रेवंथ रेड्डी यांनी शपथ घेतली.

राज्यपाल तमिलीसाई सौंदरराजन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी दोन फायलींवर स्वाक्षरी केली व ६ आश्वासनांवर मोहोर उमटवली. दिव्यांग महिलांना नोकरी, २०० युनिट वीज मोफत, शेतमजुरांना वार्षिक १२ हजार रुपये, ५०० रुपयांत गॅस, घर खरेदीसाठी वित्तीय मदत देण्याचा यात समावेश आहे. निवडणूक काळात दिलेली आश्वासने लवकरच पूर्ण केली जातील, अशी घोषणा त्यांनी केली.

रेवंथ रेड्डी यांचा अल्पपरिचय
तेलंगणाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री ए. यांनी विद्यार्थीदशेतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून (अभाविप) राजकारणात पदार्पण केले. २००६ मध्ये ते जिल्हा परिषदेवर निवडून आले. अवघ्या वर्षभरातच २००७ मध्ये ते अपक्ष रूपाने आमदार बनले. त्यानंतर त्यांनी तेलगू देसम पक्षात (तेदेप) प्रवेश केला. २००९ मध्ये ते पुन्हा आमदार बनले. परंतु २०१५ साली विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘वोट फॉर कॅश’ प्रकराणात ते अडकले राज्यात प्रतिमा मल्लित झाल्ल्यामुळे रेड्डी २०१८ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०१७-१८ मध्ये रेवंथ रेड्डी यांनी तेदेपला रामराम ठोक्त काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही मलकाजगिरी लोकसभा मतदारसंघातून ते खासदार बनले. रेवंथ रेड्डी यांच्यातील धमक, धाडसीपणा व नेतृत्वगुण पाहता काँग्रेसने त्यांना २०२१ साली प्रदेशाध्यक्ष बनवले. त्यानंतर त्यांनी तळागाळात पक्ष बांधणी करून तेलंगणात काँग्रेसला सत्तेत आणाची किमया साध्य केली

Leave A Reply

Your email address will not be published.