सावदा, ता. रावेर : कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून अवैधरित्या १३ उंट घेऊन जाणारा ट्रक सावदा पोलिसांनी काल पकडला. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून थेट राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र असे दोन आरटीओ सीमारेषा पार करुन उंट वाहतुकीचा कोणतच परवाना नसलेली ही ट्रक येथपर्यंत आली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लुमखेडा, शिवार हतनूर धरणाच्या पुलाजवळ भारतीय वंशाचे २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे एकूण १३ उंट अतिशय निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबून ट्रकमध्ये भरले होते. यात उंटांचे पाय व तोंड दोरीने बांधून उंट वाहतुकीचा कुठलाही परवाना नसताना बेकायदेशीर रित्या कत्तलीसाठी घेऊन जाणारी १० लाखाची आयशर ट्रक (सीजी- १२, बीएच – ३२८१) ही ६ डिसेंबर रोजी रात्री सावदा पोलिसांनी पकडली. या ट्रकमधील दोन जणांना सावदा पोलिसांनी ताब्यात घेतले तर
एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. याबाबत पोलीस विनोद भीमराव दामोदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिहोर जिल्ह्यातील वरखेडा येथील मकबूल खान फकृद्दीन खान (वय ४५), मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील अमरपुरा येथील अरबाज खान शकील खान (वय २१) या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशातील नोशेराबाद (देवास) खालिद खान खलील खान हा फरार झाला आहे. या सर्वांवर सावदा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनात अन्वर तडवी, मोहसीन पठाण करत आहेत.