ठाकरेंना दिलासा… मुंबई उच्च न्यायालयाने BMC ला खडसावले; राजीनामा पत्र देण्याचे आदेश…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उद्या सकाळी ११ पर्यंत याबाबतचे पत्र लटके यांना देण्यात यावं असं न्यायालयाने म्हटलं आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या लटकेंना यामुळे दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने पालिकेला राजीनामा स्वीकारणार की नाही याबद्दल २.३० वाजता भूमिका मांडण्यास सांगितलं होतं. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावलं असून, तुमच्याकडे विशेषाधिकार असताना अशी प्रकरणं आमच्याकडे येता कामा नयेत असं देखील सांगितलं आहे. पालिकेने भूमिका मांडल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

लटके या २००६ पासून महानगरपालिकेच्या सेवेत आहेत. परंतु पतीच्या निधनानंतर त्यांना ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटातर्फे उमेदवारी देण्यात आली. त्यांचाही ही पोटनिवडणूक लढवण्याचा मानस असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर आहे. पोटनिवडणूक लढवता यावी यासाठी आपण ३ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेकडे राजीनामा सादर केला होता. तसेच त्यासाठीच्या सर्व औपचारिकताही पूर्ण केल्या. परंतु आजपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही आणि आवश्यक ते आदेश काढलेले नाहीत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, नोकरीचा राजीनामा दिला तरच लटके या निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.

दरम्यान, एका सामान्य कर्मचाऱ्याच्या राजीनाम्याला एवढे महत्त्व का दिले जात आहे. उलट एका कर्मचाऱ्याला निवडणूक लढवायची आहे, तर तुम्ही त्याचा राजीनामा स्वीकारायला हवा. हे प्रकरण इथपर्यंत यायलाच नको होता, असेही न्यायालयाने पालिकेला सुनावले. सुनावणीदरम्यान राजकीय दबावापोटीच राजीनामा थांबवण्यात आल्याचा आरोप यावेळी ऋतुजा लटके यांच्यावतीने करण्यात आला होता. तर राजीनाम्याची योग्य प्रक्रिया अवलंबली नसल्याचा युक्तिवाद पालिकेने केला होता.

प्रथेप्रमाणे तुम्ही याआधी अनेकांना मुभा दिली आहे. मग ऋतुजा लटके यांच्या बाबतीत भेदभाव का केला जात आहे? अशी विचारणा न्यायालयाने पालिकेला केली. नोटीस कालावधी माफ करण्याचा पालिकेला विशेषाधिकार असताना राजीनामा का स्वीकारला जात नाही? अशी प्रकरणं न्यायालयात येता काम नयेत असंही न्यायालयाने यावेळी सांगितलं.

तत्पूर्वी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून याआधीच उमेदवाराची घोषणा झाली आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे मुरजी पटेल यांनी मतदारसंघात जोरदार प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. पण राजकारणात कधी काय होईल, याचा काहीच भरोसा नाही. कारण गेल्या दोन दिवसांपासूनच्या घडामोडी पाहता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात संभ्रमाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे मुरजी पटेल यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यासाठी पक्षादेश सर्वश्रेष्ठ आहे. पक्षाने सांगितलं तर आपण पोटनिवडणुकीला उभं राहणार नाही, अशी प्रतिक्रिया मुरजी पटेल यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गोटात अनेक घडामोडी घडत आहे. शिंदे गटाचा उमेदवार नेमका कोण असेल याबाबत विविध चर्चा सुरु आहेत. पण याबाबत आज रात्री उशिरापर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपकडून अनेक दिवसांपासून उमेदवार जाहीर झाला होता. पण गेल्या आठवड्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात झालेल्या न्यायालयीन लढाईमुळे शिंदे गटाचा उमेदवार पोटनिवडणुकीसाठी उभं करण्याचा निर्णय झाल्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटासाठी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी तात्पुरती नवी नावे आणि चिन्हे जाहीर केली आहेत. त्यामुळे कदाचित शिंदे गट या जागेवर आपला उमेदवार उभं करण्यासाठी जास्त आग्रही असल्याचीही चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.