काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाची धडक!

0

रावेर लोकसभा मतदारसंघ : मोदी लाटेत रक्षा खडसेंना मताधिक्य
जळगाव ;- तापी, वाघूर नदीचे सानिध्य लाभल्याने हिरवागार झालेल्या या मतदारसंघात पूर्वी काँग्रेसने आपली पायमुळे घट्ट रोवून ठेवली होती. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख निर्माण झाली असताना 1991 मध्ये मात्र त्याला जोरदार धक्का देत भाजपाने येथे आपले बस्तान बसविले ते आजतायगत कायम आहे. सन 2014 मध्ये स्व. हरिभाऊ जावळे यांचे तिकिट ऐनवेळी कापून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली.नरेंद्र मोदी लाटेत रक्षाताई खडसे यांना प्रचंड मताधिक्य मिळाले.

राज्यातील मतदारसंघांचा भौगोलिक विचार करता रावेर मतदारसंघाचे क्षेत्रफळ मोठे आहे. या मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. निवडक अपवाद वगळता या मतदारसंघात नेहमीच काँग्रेसची पताका फडकत राहिली. मात्र 1991 पासून आजतागायत या मतदारसंघावर भाजपने कब्जा केला आहे. तत्कालीन भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे या मतदारसंघावर वर्चस्व असल्याने ते सांगतील तोच उमेदवार भाजपाने आजपर्यंत दिला. सन 2014 मध्ये स्व. हरिभाऊ जावळे यांचे तिकिट ऐनवेळी कापून सुनबाई रक्षाताई खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेमुळे रक्षा खडसे यांना मोठे मताधिक्य मिळाले. नाराज असलेल्या हरिभाऊ जावळे यांना नंतर जिल्हाध्यक्ष करण्यात आले. पक्षशिस्त म्हणून हरिभाऊंनीही कुठलीही आदळआपट न करता पक्ष विस्तार करण्यावर भर दिला.

खासदार रक्षाताई खडसेयांच्या कामाचा झपाटा पाहून व एकनाथराव खडसे यांचे पक्षातील वजन पाहता पुन्हा 2019 मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली. रक्षाताई खडसे यांना तब्बल 6 लाख 55 हजार 386 एवढे प्रचंड मतदान झाले तर डॉ. उल्हास पाटील यांना 3 लाख 19 हजार 504, वंचित बहुजन आघाडीचे नितीन प्रल्हाद कांडेलकर यांना 88 हजार 365, बसपाचे डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते यांना 5 हजार 705 मते मिळाली होती.

मनीष जैन यांना दिली धोबीपछाड
सन 2014 मध्ये तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांचे जाहीर झालेले तिकीट कापून रक्षाताई खडसेंना उमेदवारी देण्यात आली. बदलत्या राजकीय समीकरणांचा वेध घेत, एकनाथराव खडसेंनी त्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनीष जैन यांचा 3 लाख 18 हजार मतांनी पराभव करीत चांगलीच धोबीपछाड दिली होती. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
..

Leave A Reply

Your email address will not be published.