रणजितसिंह डिसले यांना शिंदे सरकारचा दिलासा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या देशभरात चर्चेचा विषय बनलेले शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज दिलासा दिला. जागतिक पुरस्कार मिळवून लोकप्रिय झालेले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले हे प्रत्यक्षात ३४ महिने शाळेत किंवा प्रतिनियुक्तीवर नेमणूक झालेल्या जिल्हा प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयातही गैरहजर असल्याचे उघड झाले. तसेच गैरहजेरीच्या काळात काही संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचा ठपकाही अहवालात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान डिसलेंकडून ३४ महिन्यांचे वेतन वसूल करण्याची शिफारस करण्यात आलेल्या अहवालावर अद्याप प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर डिसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी आमदार सुभाष देशमुख, प्रवीण दरेकर व गिरीश महाजन आदी उपस्थित होते. ‘‘ डिसले गुरुजी आज मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. कुठल्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचे काही होऊ नये, याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत,’’ असे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.