रेल्वे उड्डाणपुलामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेल तर्फे रेल्वे फाटक मुक्त अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ ते इगतपुरी दरम्यान रेल्वे लाईन क्रॉस करून होणारी जीवघेणी वाहतूक आता जवळपास सर्व ठिकाणी उड्डाणपूला झाल्याने प्रवाशांना प्रवास सुखकर झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे होणारा त्रास वाचला आहे. जळगाव शहरात लगत असलेल्या आसोदा रेल्वे उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून महारेल तर्फे बांधण्यात येत असलेल्या या पुलाचे काम फेब्रुवारी अखेर पूर्ण होणार आहे. फेब्रुवारी अखेर हा रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने जळगाव शहरातून आसोदा, भादली, जळगाव आणि यावल तालुक्यात जाणाऱ्या येणाऱ्या हजारो प्रवाशांना प्रवास सुखकर होणार आहे. असोदा रेल्वे गेटच्या फाटकामुळे रेल्वेच्या जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांमुळे फाटक सतत बंद ठेवावे लागत होते. प्रवाशांना यामुळे आपली वाहने घेऊन तात्काळत उभे राहावे लागत होते. आता तो त्रास कमी होऊन वेळेची देखील बचत होणार आहे. जानेवारी २०२२ मध्ये महारेल तर्फे उड्डाणपुलाचे काम हाती घेऊन अगदी निहित दोन वर्षाच्या कालावधीत या रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण केल्याबद्दल महारेलला धन्यवाद दिले पाहिजे. ३३ कोटी रुपये खर्चाच्या या फुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जळगाव शहर या जिल्ह्याच्या ठिकाणाला जोडणारा हा पूल असोदा, भादली, शेळगाव तसेच यावल तालुक्यातील जनतेसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. जळगाव शहरात नोकरी करणारे अनेक जण आसोदा भादली या गावांमध्ये राहून अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांसाठी आता या उड्डाणपुलामुळे वेळ वाचणार आहे. रेल्वे फाटक बंद मुळे अनेक वाहने तात्काळत उभी राहत होती. मात्र आता वेळ आणि इंधनाची सुद्धा बचत होणार आहे. नुकतेच जळगाव शहरातील भोईटेनगर उड्डाणपुलाची सुद्धा लोकार्पण झाले. जळगावच्या रिंग रोड वरून शिवाजीनगरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी या पुलामुळे फार मोठी वेळेची बचत होत आहे. त्याचबरोबर रेल्वे उड्डाणपूलामुळे पिंप्राळा परिसरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय सुद्धा दूर होणार आहे. रिंग रोड वरून पिंपळाकडे जाणाऱ्या डाव्या भागाचे काम सुद्धा पूर्णत्वास आले असून एका आठवड्याभरात पिंप्राळाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. भोईटेनगर पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुद्धा महारेलतर्फे निहित वेळेत पूर्ण केले. नुकताच त्यांच्या लोकार्पण सोहळा पार पडला. लोकार्पण सोहळ्यात श्रेय वादासाठी राजकारणी नेते मंडळींनी खदखद व्यक्त केली आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी लोकार्पण सोहळ्यानंतर कोणशिलेची तोडफोड करून आपले हिडीस प्रदर्शन जनतेस दाखवून दिले. परंतु प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महा रेलच्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्यांच्या कृतीचा तीळमात्र परिणाम झाला नाही. कारण त्यांना श्रेयवाद ऐवजी निहित वेळेत काम करण्याचे श्रेय द्यायचे असते. त्यामुळे महा रेलचे अभिनंदन करणे आवश्यक आहे..

 

महारेलच्या कामाचा आदर्श इतर ठेकेदारांनी घेण्याची गरज आहे. कारण शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम ज्या पद्धतीने रेंगाळत होते, तो एक ठेकेदाराचा अजब नमुनाच म्हणता येईल. निहित वेळेत सदर शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम ठेकेदारांनी केले नसल्याने लाखो प्रवाशांचे हाल झाले. निहित वेळेनंतरही दीड वर्षानंतर रेल्वे उड्डाण पुलाचे काम कसेबसे पूर्ण झाले. जळगाव मुख्य शहराला शिवाजीनगर वाशीयांचे दररोज शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून तर नोकरी करणारे तसेच आजारपणा उपचार घेणारे जळगाव शहरात येण्यासाठी हाल झाले. त्याचा त्रास प्रवाशांना भोगाव लागला. याची किंमत ठेकेदारांना कळत नाही, यासारखी दुर्दैवी बाब नाही. तरीसुद्धा आमचे लोकप्रतिनिधींकडून या ठेकेदाराला पाठीशी घातले गेले, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. टक्केवारीच्या पुढे सर्वसामान्य जनतेला लोकप्रतिनिधी सुद्धा वेठीस धरतात हे सर्वश्रुत आहे. त्या पुलाचे काम वेळेत होत नसल्याने अनेक वेळा शिवाजीनगर वासियांनी आंदोलन केले. तेव्हा कुठे या पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र अशा ठेकेदारांना काळ्या यादी टाकावी ही जनतेची मागणी काही पूर्ण झालेली नाही. त्याकरता महारेलचा आदर्श ठेकेदारांनी घेतला पाहिजे. असोदा रेल्वे उड्डाणपूल आणि भोईटेनगर, पिंपळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम महारेलने पूर्ण केल्याने जळगावकर प्रवासी धन्यवाद देत आहेत. महा रेलच्या कामाच्या गुणवत्तेचाही आदर्श इतर खाजगी ठेकेदारांनी घेणे गरजेचे आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.