वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात राहुल गांधींच्या घरी पोहचले पोलीस

0

नवी दिल्ली , लोकशाही न्युज नेटवर्क
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस रविवारी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी आणि डीसीपी सध्या राहुल गांधी यांच्या घरात उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. तासाभरानंतरही राहुल पोलिसांना भेटले नाही, अशी देखील माहिती मिळतेय.

राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी पवन खेडा त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मात्र पोलिसांनी आधी त्यांना आत जाण्यापासून रोखले. मात्र, नंतर परवानगी देण्यात आली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. पवन खेडा म्हणाले की, राहुल गांधींना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारला काय वाटलं ते घाबरतील?, असं खेडा म्हणाले.

खरे तर श्रीनगरमधील भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी आजही महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचे विधान केले होते. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना 16 मार्च रोजी नोटीस पाठवून विचारणा केली होती की, हे बोलणाऱ्या महिला कोणत्या आहेत. राहुल गांधींनी त्याची माहिती दिल्ली पोलिसांना द्यावी. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्याने अद्याप दिल्ली पोलिसांना उत्तर दिलेले नाही.

विशेष सीपी (कायदा व सुव्यवस्था) सागरप्रीत हुड्डा यांनी सांगितले की, आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी आलो आहोत. राहुल गांधी यांनी 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये विधान केले की यात्रेदरम्यान ते अनेक महिलांना भेटले आणि त्यांनी राहुल गांधींना सांगितलं की, त्यांचं लैंगिक शोषण झालंय. त्यामुळेच आम्ही त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून पीडितांना न्याय मिळू शकेल.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.