प्रधानमंत्री आवास योजनेत १९० लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर तालुक्यातील पाल येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील १९० भूमीहीन लाभार्थ्यांचे स्वतःच्या मालकीच्या घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे. जागेअभावी पाल येथील पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या पाल येथील सरकारी गुरचरण क्षेत्रात ९५ हजार चौरस फूट जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांचे ५०० चौरस फुटांचे घर साकार होणार आहे ‌.

पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पाल येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या जागेच्या प्रश्नांवर वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रावेर गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास तात्काळ मान्यता दिली आहे.

पाल येथील गट नंबर २८८ मधील महसूल व वन विभागाच्या ताब्यातील सरकारी गुरचरण ११७.७४ हेक्टर क्षेत्रापैकी ९५ हजार चौरस फूट (८८२९ चौरस मीटर) क्षेत्रास प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र १९० भूमीहीन लाभार्थ्यांकरिता ग्रामीण गृह प्रकल्प राबविण्यास पाल ग्रामपंचायतीस उपलब्ध करून दिली आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित जागेचा प्रश्न ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी चुटकीसरशी सोडविल्याबद्दल लाभार्थ्यांनी त्यांचे व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.