पोषण आहाराच्या विक्रीत अधिकाऱ्यांचा ‘अर्थ’पूर्ण सहभाग !

0

भुसावळ तालुक्यातील प्रकार : वरिष्ठांचे होतेय्‌ दुर्लक्ष
जळगाव ;- शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराला भ्रष्टाचाराची किड लागली असून पोषण आहाराच्या विक्रीत अधिकाऱ्यांचा ‘अर्थ’पूर्ण सहभाग असल्याचे दिसून येत आहे. भुसावळ तालुक्यात हा प्रकार खुलेआम होत असतांनाही कठोर कारवार्इ होत नसल्याने या भोंगळ कारभाराचे ‘पोषण’ होत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष होत आहे.
भुसावळ तालुक्यातील विविध शाळांमध्ये शासनाकडून शालेय पोषण आहाराचे वाटप होत असून मुख्याध्यापक अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मालाची खाजगी व्यापाऱ्यांकडे परस्पर विक्री करीत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. सोमवारी भुसावळ शहरातील र.न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरातील पोषण आहाराचा तांदूळ विक्रीसाठी नेत असताना पकडण्यात आला. विद्यामंदिरातील स्वयंपाकगृहात ठेवण्यात आलेला 20 कट्टे तांदूळ, 50 किलो मसूर, 50 किलो हरभरा, 50 किलो मटकी असा पोषण आहार मुख्याध्यापिका रिता शर्मा यांनी अडत व्यापारी योगेश हेडा यांना परस्पर विक्री केल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थ्यांचा तोंडचा घास हिराविला जात असतांनाही त्याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसून एकमेकांकडे बोट दाखविण्यात मग्न आहेत.

सेंट्रल किचन योजनेला ‘बगल’
शासनाकडून सेंट्रल किचन योजना बऱ्याच ठिकाणी राबविण्यात येत असून त्यामाध्यमातून भ्रष्टाचाराला लगाम लावला जात आहे. मात्र भुसावळ तालुक्यात या योजनेला अधिकाऱ्यांच्या ‘अर्थ’पूर्ण सहभागामुळे बगल दिली जात आहे. बहुतांश शाळांनी प्रशासनाला अद्यावत स्वयंपाकगृह असल्याचे खोटे पत्र देवून यातून पळ काढला आहे. मुलांच्या तोंडचा घास हिरावून काही धनदांडग्यांच्या झोळ्या भरण्यात अधिकारी मग्न असल्याचे यातून दिसून येते.सेंट्रल किचन योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ आहार पुरविला जात असतांनाही भुसावळ तालुक्यात मात्र या योजनेला बळ का दिले जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कठोर कारवाईची मागणी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शालेय विभागाकडून नाविण्यपूर्ण योजना राबविण्यात येत असतांना त्याला स्थानिक अधिकारी मात्र अर्थपूर्ण सहभागामुळे ब्रेक लावत असल्याने शासनाचा उद्देश सफल होत नसून विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या शाळा, स्थानिक अधिकारी यांच्यावर कठोर कारवार्इ करावी अशी मागणी पालकांकडून जोर धरत आहे.

सजग पालकांची तक्रार… माजी नगरसेवकांचा पुढाकार
भुसावळ शहरातील र.न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरातील शालेय पोषण आहाराची विक्री होत असल्याची तक्रार सजग पालकांनी माजी नगरसेवक राहुल बोरसे यांच्याकडे केल्यानंतर श्री. बोरसे यांनी थेट तहसीलदारांकडे तक्रार करुन पोषण आहार घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करुन त्यावर कारवार्इ करण्यास भाग पाडले. शहरात अन्य शाळांमध्येही असे प्रकार दिवसा-ढवळ्या होत असतांना त्याकडे मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

अधीक्षक रजेवर अहवाल टांगणीवर !
शालेय पोषण आहार अधीक्षक अजित तडवी हे गेल्या तीन-चार दिवसांपासून रजेवर असल्याने त्यांच्याकडून चौकशी होणे आहे; अधीक्षकांच्या रजेमुळे वरिष्ठांना पाठविण्यात येणारा अहवाल मात्र टांगणीवर आहेत. श्री. तडवी हे काय अहवाल वरिष्ठांना देतात त्यावर पुढील कारवार्इ अपेक्षित आहे.

‘‘
पोषण आहार अधीक्षक अजित तडवी रजेवर असल्याने चौकशी झालेली नाही, ते आल्यानंतर चौकशी करतील त्यांनतर अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येर्इल. दोषींवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने नक्कीच कारवार्इ होर्इल.
– किशोर वायकोळे
गटशिक्षणाधिकारी, पं.स. भुसावळ

Leave A Reply

Your email address will not be published.