‘त्या’ बंगल्यांचा कर रश्मी ठाकरे का भरत होत्या?; सोमय्यांचा सवाल

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावर किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलं.

अलिबागमध्ये ठाकरे कुटुंबाच्या मालकीचे बंगलेच नाहीत. मग रश्मी ठाकरे त्या बंगल्यांचा कर कसा काय भरत होत्या? राऊत नेमके कोणाला अडचणीत आणत आहेत? सोमय्यांचं नाव वापरून ते ठाकरेंबद्दलची खुन्नस काढत आहेत का?, अशी प्रश्नांची सरबत्ती सोमय्यांनी केली. ते नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

अलिबागमध्ये असलेल्या १९ बंगल्यांचा मालमत्ता कर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी भरला. २०१३ ते २०२० पर्यंत ग्रामपंचायतीकडे कर भरला जात होता. त्यांच्या बँक खात्यामधून थेट रक्कम RTGS व्हायची. जर बंगल्यांची मालकी त्यांच्याकडे नव्हती, तर मग कर का भरले जात होते, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला. ठाकरेंच्या मालकीचे कोणतेच बंगले कोरलाई गावात नसल्याचं राऊत सांगतात. पण रश्मी उद्धव ठाकरे तर त्या बंगल्यांचा कर भरत होत्या. मग आता राऊत त्यांना जोड्यानं मारणार का, असा प्रश्नदेखील सोमय्यांनी विचारला.

रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांचं नाव कोरलाई ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये आहे. त्यांनी बंगल्यांचा मालमत्ता कर भरला. त्यामुळे संजय राऊत यांनी रश्मी ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना त्या बंगल्यात घेऊन जावं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही घरपट्टी भरली जात होती. त्यामुळे आता ठाकरेंनी या प्रश्नाचं उत्तर राज्यातील जनतेला द्यावं, असं आव्हान सोमय्यांनी दिलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.