जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क :
आज दिनांक १ ऑगस्ट रोजी पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे सीबीएसई शाळांसाठी भारत सरकार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, रस्ता सुरक्षा कक्ष यांचेकडून आलेल्या निर्देशानुसार रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. दिवसेंदिवस रस्त्यावरील अपघात वाढत असून त्यात मृतांच्या संख्येत चिंतनीय वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी नुसार भारतात दरवर्षी सुमारे ४ लाख रस्ते अपघात होतात व जवळपास दीड लाख भारतीयांचा मृत्यू होतो. सरासरी दिवसाला ४२२ तर दर तासाला १८ भारतीय केवळ रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. रस्ता अपघातात प्राण गमावणारे सर्वाधिक १८ ते ४५ वयोगटातील तरुण आहेत. ८०% अपघात मानवी चुकांमुळे होत असतात म्हणून नागरिकांमध्ये रस्ते अपघातां विषयी जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले तरच अपघातांपासून बचाव करता येईल असे मत मांडले.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्यातर्फे देशभरातील सीबीएसई शाळांमध्ये रस्ता सुरक्षा जागरूकता सामग्री वितरीत करण्यात आली आहे. पोदार शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पटल, चिन्ह आणि चिन्हदर्शक पुस्तिका यांच्या सहाय्याने वाहतुकीचे नियम,सुरक्षित वाहतूक,अपघाताची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी माहिती घेतली.
शाळेचे उपमुख्याध्यापक दिपक भावसार, पोदार जंबो किड्सच्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ, वरिष्ठसमन्वयक हिरालाल गोराणे, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.