मंत्र्यांच्या मोठेपणाला लागले कोनशिला तोडून गालबोट

0

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाचे महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने ५३ कोटी रुपये खर्च करून शिवाजीनगर तसेच पिंप्राळ्यासाठी मोठी सोय झालेली आहे.

जळगावात पुलाच्या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मनपा प्रशासक विद्या गायकवाड, खासदार उमेश पाटील, आमदार राजू मामा भोळे, माजी महापौर जयश्री महाजन आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. परंतु पुलाच्या उद्घाटन सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन आणि अनिल भाईदास पाटील यांची निमंत्रण पत्रिकेत नावे नसल्याने उद्घाटन सोहळा दरम्यान भाजपात मानापानाच्या नाट्याची भाषणे रंगली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “महाराष्ट्र शासनातर्फे पुलासाठी पैसे देण्यात आले, तथापि महारेलतर्फे प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. गिरीश महाजन आणि अनिल पाटील या मंत्री द्वयींची नावे पत्रिकेत नसल्याने हा मंत्र्यांचा नव्हे तर जनतेचा अपमान आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमाला येणारच नव्हतो,” असे वक्तव्य केले. पत्रिकेत नाव नसताना मंत्री गिरीश भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, म्हणून गिरीश महाजनांच्या मनाच्या मोठेपणाची गुलाबराव पाटलांनी तारीफ केली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी भाषणात पत्रिकेत नावे टाकली नसली तरी हा जळगावचा आपला कार्यक्रम म्हणून उपस्थित राहिल्याचे सांगितले. परंतु दोन्ही मंत्र्यांनी उद्घाटन सोहळा आयोजकांविषयी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.

विशेष म्हणजे पत्रिकेत विरोधी पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचे नाव असल्याने सत्ताधारी मंत्र्यांना ही बाब विशेष टोचली, एवढे मात्र निश्चित.. परंतु उद्घाटन सोहळ्यात पिंप्राळा उड्डाणपुलाचे काम वेळेच्या आत पूर्ण केल्याबद्दल महारेलची स्तुती दोन्ही मंत्र्यांनी केली, परंतु मानापानाची नाट्य उमटतील असे वाटले नव्हते. परवा पुलाचे उद्घाटन झाले आणि काल अज्ञातांनी पिंपराळा रेल्वे उड्डाण पुलाची कोनशीला तोडून उद्घाटन सोहळ्याला गालबोट लावले. कारण ‘पत्रिकेत नावे नसली तरी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिलो’, असे म्हणून मनाचा मोठेपणा दाखवणाऱ्या मंत्र्यांच्या मोठेपणाला कोनशीला तोडल्याने गालबोट लावले गेले.

अखेर उद्घाटन सोहळा कार्यक्रमाला राजकारणाचे गालबोट लावले गेले. मंत्र्यांची नावे नसल्याने त्यांच्या समर्थकांकडून ही कृती झाली असावी काय? याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. विकासाच्या कार्यक्रमात राजकारण करायला नको. विरोधी पक्षाच्या आमदाराचे नाव टाकण्यामागे महारेलचा हेतू समजून घेतला पाहिजे. तसेच सत्तेत असलेल्यांनाच समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून बोलावले पाहिजे, हा आग्रह कशासाठी? एका चांगल्या उड्डाणपूलाच्या उद्घाटन सोहळ्याला त्यामुळे गालबोट लागले. ज्या कोणी अज्ञातांनी ही कृती केली असेल, ती विकृती जाहीर झाली पाहिजे.

महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. विकासाच्या कामात राजकारण करायला नको. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटन सोहळ्यात निमंत्रण पत्रिकेत नावे टाकली नाही, म्हणून जाहीर टीका करायला नको होती. ते जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने दोन्ही बाजू समजून घेऊन जाहीर टीका न करता सांभाळून घ्यायला हवे होते. उलट “मी तर या कार्यक्रमाला येणारच नव्हतो” असे म्हणून आपल्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होईल असे वक्तव्य करायला नको होते. याचा अर्थ ‘पुलाच्या उद्घाटन सोहळा आयोजकांनी विरोधकांचे ऐकून मंत्र्यांची नावे टाकली’, असा होऊन, गैरसमज निर्माण झाल्याने हा प्रकार घडला नसावा हे कशावरून..! त्यामुळे विकास कार्यक्रमात जाहीर वक्तव्य करताना लोकप्रतिनिधींनी संयम पाळणे आवश्यक असते.

गुलाबराव पाटलांनी संयम पाळायला हवा होता. उद्घाटन सोहळ्यानंतर सदर कार्यक्रमाच्या आयोजकांना बोलवून या संदर्भात त्यांची कान उघडणे केली असती तर कोनशीला तोडण्याच्या प्रकारामुळे जे गालबोट लागले ते घडले नसते. या कोनशीला तोडण्याच्या प्रकारामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधी अथवा मंत्री यांनी सोहळ्यात केलेली भाषणे याला गालबोट लागले आहे. या कोनशीला तोडण्याच्या प्रकाराची पोलिसांकडून निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. तसेच आरोपींचा शोध घेऊन त्यांची नावे जाहीर करावीत, म्हणजे कोनशीला पाडण्यामागचा उद्देश स्पष्ट होईल. तसेच अशा प्रकारचे विकृत कृत्य करणारे कोणाचे समर्थक आहेत? हेही त्यातून स्पष्ट होईल आणि ‘दूध का दूध, पानी का पानी’ हा प्रकार स्पष्ट होईल. आता पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याचा तपास लागेपर्यंत कोनशीला तोडल्याने लागलेल्या गालबोटाची मात्र उलट सुलट चर्चा होत राहील…!

Leave A Reply

Your email address will not be published.