पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण

0

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव शहरातील जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर ज्या धीमे गतीने त्याचे काम पूर्ण झाले त्याने जळगाव शहर तसेच शिवाजीनगर आणि त्या परिसरातील ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली होती. सदर उड्डाणपूल लवकर व्हावा म्हणून अनेक मोर्चे निघाले, आंदोलन करण्यात आले. शेवटी निहित कालावधीच्या दुप्पट कालावधीनंतर म्हणजे तब्बल तीन वर्षानंतर कसेबसे हे काम पूर्ण झाले. तरीसुद्धा साईड रस्त्याच्या कामांमध्ये त्रुटी आहेतच. दोन्ही साईड रस्त्यावर वाहतूक कोंडी होतेच आहे. पण जळगावकर नागरिक ते सहन करतात. सदर पुलाचे बांधकाम करण्याऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे ही मागणी मान्य झालेली नाही. अशा ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय लोकप्रतिनिधीमुळे बांधकाम व्यवसायातील टेंडर माफीयांचे राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे जनतेच्या माती मारली जात आहेत. हा अनुभव आहे. परंतु पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम शिवाजीनगर उड्डाणपूल यापेक्षा मोठे असतानाही ते वेळेच्या आधी पूर्ण झाले. त्याबद्दल महारेलचे अभिनंदन नक्कीच केले पाहिजे.

आता पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल पुलाचे ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होऊन त्याचे लोकार्पणही करण्यात आले. फेब्रुवारी 2022 मध्ये या पुलाच्या बांधकामाच्या शुभारंभ झाला होता. महाराष्ट्र शासन आणि रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त ५३ कोटी रुपये किमतीच्या या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ झाला. त्यावेळी दोन वर्षाच्या आधीच या पुलाचे बांधकाम पूर्ण होईल, असे संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आश्वासित केले होते. ते आश्वासन दोन महिन्या आधीच त्यांनी पूर्ण केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. कारण रिंगरोड शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल काही वेगळाच होता. या पुलामुळे जळगाव शहराच्या रिंग रोड वरून आता शिवाजीनगरला अवघ्या दहा मिनिटातच पोहोचता येणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना शिवाजीनगर तसेच कानळदा ग्रामीण भागात जाण्यासाठीचा फार मोठा फेरा वाचणार आहे. निहित वेळेच्या आधी या पुलाचे बांधकाम होऊन तो पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने जळगावकर नागरिकांना सुखद धक्का मिळाला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन या पुलाचे उद्घाटन झाले. त्याआधी जळगाव शहरातील पुलाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित जे मानापानाचे नाट्य घडले, ते टाळायला हवे होते. महाराष्ट्र शासनाचा पैसा या पुलाच्या बांधकामासाठी लागलेला असताना उद्घाटन सोहळा पत्रिकेत पालकमंत्री ग्राम विकास मंत्री यांची नावे नसल्याने नाराजीचा सूर आयोजकांच्या संदर्भात उमटला. तरीसुद्धा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल दोन्ही मंत्रांना धन्यवाद दिले पाहिजे. इतकेच नव्हे तर दोन्ही मंत्र्यांनी निहित वेळेच्या आत पिंप्राळा उड्डाणपुलाचे सुंदर बांधकाम झाल्याबद्दल कंत्राटदारांची स्तुती देखील केली. हा त्यांचा मोठेपणा म्हणावा लागेल. यापुढे अशी चूक होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. त्याचबरोबर या पुलासाठी लागणाऱ्या मोबदल्याची ज्याची शासनाने अधिवृष्टी केली त्यांना त्यांचा मोबदला अद्याप महापालिकेने दिलेला नाही. तो तातडीने दिला पाहिजे. अन्यथा शहरवासी यांचे महापालिकेला सहकार्य मिळणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे…!

Leave A Reply

Your email address will not be published.