पारोळा ;-तालुक्यातील पिंप्री येथे अज्ञात चोरटयांनी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला टांगलेली किल्ली घेऊन त्याद्वारे घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना ६ रोजी सकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , शेतकरी असलेले संदीप लालचंद पाटील हे आपल्या कुटुंबियांसह येथे वास्तव्याला असून ते आईसह शेतात कामाला निघून गेले. यानंतर संदीप पाटील यांचे वडील लालचंद पाटील यांनी नेहमीप्रमाणे घराची चावी बाजूला टांगून ते गुरांना चारा देण्यासाठी सकाळी सडे आठ वाजेच्या सुमारास निघून गेले . मात्र सडे नऊ वाजता ते घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यात अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप उघडून कपाटातील १ लाख १० हजार रोख ,तसेच ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे टोंगल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संदीप पाटील यांनी पारोळा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे करीत आहे.