‘एक हात मदतीचा’ : कोमात गेलेल्या विद्यार्थ्यासाठी सरसावले विद्यार्थी शिक्षक

0

मदत फेरीतून १० हजारांचे सहाय्य ; ग्रामस्थांचीही मदत

पहूर , ता . जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क

झाडाची फांदी डोक्यावर पडल्यामुळे कोमात गेलेल्या विद्यार्थ्याच्या वैद्यकीय मदतीसाठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक पुढे सरसावले असून ‘एक हात मदतीचा ‘ या मदत फेरीद्वारे १० हजार रुपयांची मदत पालकांच्या स्वाधीन केली आहे .

पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावी मध्ये शिकणारा विष्णू गणेश कुमावत हा हिवरखेडा ( ता . जामनेर ) येथील विद्यार्थी शनिवारी दुपारी ३ वाजता पिंपळाची फांदी डोक्यात पडल्याने गंभीररित्या जखमी झाला . त्याला तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले .त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यास पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास जळगाव येथेच डॉ . डाबी यांच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून तिथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत . गेल्या ५ दिवसांपासून तो बेशुद्धावस्थेत असून डॉक्टर त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत .

शाळा धावली मदतीला

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे मदतीसाठी देऊन शिक्षकांच्या सहकार्याने गावातून तसेस बस स्थानक परिसरातून ‘एक हात मदतीचा ‘ हा उपक्रम राबवत माणुसकीचे दर्शन घडविले . या उपक्रमाद्वारे १० हजार रुपयांचा निधी संकलित झाला असून सदर निधी जखमी विष्णूचे वडील गणेश कुमावत यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे .

जखमी विष्णूची घरची परिस्थिती हालाखीची असून आई आणि वडील शेतमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात . अचानक आलेले हे संकट दूर करण्यासाठी ग्रामस्थ मदत करत आहेत .हिवरखेडा येथील भाऊराव पाटील , भास्कर पाटील ,उत्तम पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी वाकोद ,हिवरखेडा ,पिंपळगाव , वडगाव , हिवरी येथेही मदतीसाठी पदर पसरवून उपचारासाठी निधी संकलित केला आहे .विष्णू गणेश कुमावत या विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी दात्यांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.