सोशल मीडिया आणि तरुणाई

0

लोकशाही, विशेष लेख

 

आजच्या युगात सोशल मीडिया (Social media) लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या जीवनाचा भाग झाला आहे. जगाच्या पाठीवर कुठेही दूर असणारी व्यक्ती सोशल मीडियामुळे जवळ आली. परंतु, सोशल मीडियामुळे आपल्या जवळची व्यक्ती दूर तर जात नाही ना? याचा मात्र नक्की विचार करावा. कारण बहुधा असे बघितले जाते की, आम्ही सोशल मीडियामध्ये इतके गुंग झालेलो असतो की, जवळची व्यक्ती आम्हाला काय सांगत आहे याकडे आमचे लक्ष नसते. व्हाटसअप (Whatsapp) संदेशावरून पती-पत्नीचे भांडण, घटस्फोट यांचे प्रमाण देखील वाढले आहे. एका सर्व्हेक्षणानुसार सोशल मीडियावर दारू पिणाऱ्या व्यक्तींच्या फोटोंमुळे तरुणांना व्यसन लागले आहे. तरुणाई नैराश्याच्या गर्ततेत बुडाली आहे.

सोशल मीडिया युवकांना मत मांडण्याचे अधिकार देते, स्वातंत्र्य देते ही गोष्ट जरी खरी असली तरीयाच सोशल मीडियामुळे वर्णद्वेष, धर्मदेष, जातीवाद, प्रांतवाद पसरवला जातो. अंधश्रद्धा, अश्लिलता पसरवली जाते. रेव्हपार्टीचे आमंत्रण येथून दिली जातात. फेक अकाउंट उघडून तरूण तरुणींची फसवणूक केली जाते. नकळत त्या वयामध्ये सेक्शुअल मटेरियलचा मारा याच सोशलमिडियामुळे घातला जातो. सोशल मीडियामुळे युवकांचे, समाजाचे, देशाचे जर नुकसान होत असेल तर नक्कीच हे घातक ठरू शकते. महापुरुषांच्या विरोधात, धर्माच्या विरोधात पोस्ट करून लोकांच्या अस्मिता, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, याची निश्चितच काळजी घ्यायला हवी.

प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तसेच सोशल मीडियाचे व्यक्तीगत आयुष्यावर, समाजमनावर चांगले आणि वाईट दोघं परिणाम होतात. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यावर त्या व्यक्तीला, सोशल मीडियावर संदेश टाकल्यावर तात्काळ मदत होत असेल, त्या व्यक्तीचे प्राण वाचत असतील तर निश्चितच हा सोशल मिडीयाचा चांगला वापर आहे. कारण सोशल मीडियाचा उपयोग व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी व्हावा ना की जीव घेण्यासाठी.
नोकरी, रोजगार, व्यवसाय यासंदर्भातील सूचना प्राप्त होणे, अभ्यासाचे समूह तयार करून शैक्षणिक विकास करणे हा देखील सोशल मीडियाचा चांगला वापर आहे.

खरे तर माध्यमे वाईट नसतात, तर आपण त्याचा वापर कसा करतो यावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम अवलंबून असतात. आपल्याकडे तंत्रज्ञान आले, त्याचा निश्चित शोधकबुद्धीनेच वापर केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात,
सोनियांचा कळस | माजी भरला सुरारस ||
मृतिकेचा घट । माजी अमृताचा साट ||

म्हणजे सोन्याच्या कळसात मदय , तर मातीच्या घड्यात अमृत यापैकी तुम्ही कशाची निवड कराल? हेआताआपणठरवलेपाहिजे. म्हणून नकारात्मकतेचा, वाईटाचा त्याग करून, सकारात्मकतेचा, चांगल्याचा पुरस्कार केल्यास युवकांनी सोशल मीडियावर मुक्त संचार करण्यास हरकत नाही.

वर्षा रविंद्र उपाध्ये
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.