पाचोरा ग्रामीण रुग्णालयात गोर गरीब जनतेची होत आहे आर्थिक लुट

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीस आलेल्या गोर गरीब जनतेकडून रुग्णालयातील परिचारिका महिला प्रसुती झाल्यानंतर नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणावर खुशालीच्या नावाखाली आर्थिक लुट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

पाचोरा ग्रामीण रुग्णालय हे अनेक तालुक्यांना सोयीचे असल्याने याठिकाणी सोयगाव, एरंडोल व पाचोरा तालुक्यातील गोर गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. असाच एक प्रकार २३ जुलै रोजी सोयगाव तालुक्यातील सुभाष सुपडु बारुड यांची मुलगी काजल युवराज रोशे ही विवाहिता पाचोरा ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी आली होती. दरम्यान काजल नार्मल प्रसुती होवुन एका गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका यांनी थेट काजल हिचे वडील सुभाष बारुड यांचेकडे खुशाली म्हणुन १ हजार ५०० रुपयांची मागणी केली. सुभाष बारुड यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने इकडुन तिकडुन तजबीज करुन परिचारिकेस १ हजार ५०० रुपये दिले. तद्नंतर परिचारिका यांनी बाळाचे वजन कमी असल्याने सुभाष बारुड यांना बाळास खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगितले. सदरचा प्रकार रिक्षाचालक शहबाज बागवान यांना कळाल्यानंतर शहबाज बागवान यांनी काजल व तिचे वडिल सुभाष बारुड यांना रिक्षातुन कुठलेही मुल्य न घेता सोडले. रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर उपचार करणे याच कामासाठी ग्रामीण रुग्णालयात परिचारिका यांना दरमहा शासनातर्फे मोठ्या स्वरूपाचा पगार दिला जातो‌. मग या परिचारिकांना गोर गरीब जनतेकडून खुशालीच्या नावाखाली पैसे मागण्याचा काय हक्क आहे ? वारंवार घडणाऱ्या अशा प्रकरणांची आरोग्य प्रशासनाने चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व साधारण जनतेकडून जोर धरु लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.