“समाजमाध्यमे आणि मराठी भाषा” या विषयावर समूहचर्चेचे आयोजन

0

 

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळेतील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातंर्गत गुरूवार दि. १८ जानेवारी रोजी “समाजमाध्यमे आणि मराठी भाषा” या विषयावर समूहचर्चेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. उमेश गोगडिया, डॉ. मनोज पाटील, मराठी भाषा विभागप्रमुख प्रा. म. सु. पगारे हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. मनोज पाटील यांनी समाजमाध्यमाव्दारे लिहिणा-यांची संख्या वाढलेली असून जणूकाही त्यांना या आभासी जगाने एकप्रकारे मंच उपलब्ध करून दिला आहे व माध्यमांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत आपापल्या बोलींमध्ये विचार वा बातमी किंवा इतर तत्सम गोष्टी पोहोचू लागल्या आहेत असे मत चर्चेच्या प्रारंभी व्यक्त केले तर डॉ. उमेश गोगडिया यांनी समाजमाध्यमावर वाचणा-यांची संख्या तर वाढतच आहे त्याच बरोबर व्यक्त होणा-यांची संख्यासुध्दा मोठया प्रमाणात वाढलेली आहे. डॉ. दीपक खरात यांनी समाज माध्यमांनी गावखेडयातील माणसांना समाजमाध्यमांनी अभिव्यक्तीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या सुप्त कलागुणांना सादर करण्यासाठी एक हक्कांचे माध्यम उपलब्ध झाले आहे. विद्यार्थिनी कविता बोरसे हीने समाज माध्यमाच्या अतिवापरामुळे माणूस हा वाचनापासून दूर जात आहे अशी भीती व्यक्त केली तर अनुष्का पवार हीने माध्यमांमुळे जग आभासी होत आहे असे मत मांडले. जितेंद्र नाईक याने माध्यमांमुळे खेडेगावातील सर्वसामनृय लोकांना जगात कुठे काय चालले आहे याची माहिती क्षणात उपलब्ध होते असे मत मांडले.

या समूह चर्चेचा अध्यक्षीय समारोप करतांना प्रा. म. सु. पगारे यांनी समाज माध्यमांच्या दोषावर बोट ठेवले. माणुस समाज माध्यमांच्या एवढा आहारी गेला आहे की, त्यांच्याशिवाय काहीच सुचत नाही. त्यामुळे नवनवीन व्याधी निर्माण होत आहे मात्र समाज माध्यमांचा वापर योग्य केला तर मनुष्य अधिकाधिक प्रगती साधू शकेल. समाज माध्यमांच्या वापराकरीता नियमावली स्वत: तयार करणे आवश्यक आहे असे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृष्णा संदानशिव तर आभार डॉ. सुदर्शन भवरे यांनी मांडले. प्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.