विद्यापीठाकडून दोन दिवसांत एकाचवेळी ६३ महाविद्यालयांमध्ये “स्कुल कनेक्ट उपक्रम

0

जळगाव ;- पदवी स्तरावर नवीन शैक्षणिक वर्षात लागू होणा-या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने तीन जिल्ह्यांमध्ये दोन दिवसात एकाचवेळी ६३ महाविद्यालयांमध्ये “स्कुल कनेक्ट” हा उपक्रम राबवून १६१४८ विद्यार्थी, शिक्षक व पालकांपर्यंत हे धोरण पोहचविण्यात यश प्राप्त केले.

गतवर्षी पदव्यूत्तर स्तरावर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले. आता सन २०२४-२५ पासून पदवी स्तरावर हे धोरण लागू केले जाणार असल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यापर्यंत या धोरणाची सविस्तर माहिती व्हावी यासाठी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने दि. ९ व दि. १० जानेवारी रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये “स्कुल कनेक्ट” हा जनजागृती परिसंवाद घेतला. तीन जिल्ह्यातील ६३ महाविद्यालयांमध्ये या दोन दिवसात घेण्यात आलेल्या या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद लाभला. या उपक्रमात जे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार होते त्यांची प्रारंभी कार्यशाळा घेण्यात आली होती. महाविद्यालयांमध्ये जावून शैक्षणिक धोरणाची माहिती एकाच प्रकारची विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहचती होईल यामध्ये कोणताही परस्पर विसंवाद राहायला नको या पध्दतीचे सादरीकरण (प्रेझेन्टेंशन) तयार करण्यात आले आणि या २० तज्ज्ञ प्राध्यापकांनी दोन दिवसात ६३ महाविद्यालयांमध्ये “स्कुल कनेक्ट” या उपक्रमाव्दारे धोरणाची माहिती पोहचवली. ज्या महाविद्यालयांमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या महाविद्यालयांना त्या परिसरातील इतरही महाविद्यालय जोडल्यामुळे एकुण ११२ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये या उपक्रमात सहभागी होवू शकले. १६ हजार १४८ पैकी बारावीचे ८२७३ विद्यार्थी, तर पदवीच्या शेवटच्या वर्षाचे ५४३१ विद्यार्थी, १७६२ शिक्षक आणि ६८२ पालक या दोन दिवसाच्या उपक्रमात सहभागी झाले. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे शंकाचे निरसनही या कार्यशाळेत करण्यात आले. त्यांच्याकडून फिडबॅक फॉर्म भरून घेण्यात आले. ८६ टक्के जणांनी ही कार्यशाळा चांगली झाल्याचे मत व्यक्त केले आहे तर ८८ टक्के सहभागी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेतील माहितीचे सादरीकरण समजल्याचे या फिडबॅक फॉर्ममध्ये नमूद केले आहे तर ८६ टक्के विद्यार्थ्यांनी ही कार्यशाळा करिअर आणि भविष्यातील अभ्यासक्रमांच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले. भविष्यातही ज्या महाविद्यालयांमधुन या धोरणाबाबत माहिती होण्यासाठी कार्यशाळेची मागणी केली जाईल त्या ठिकाणी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. विद्यापीठाने या “स्कुल कनेक्ट” उपक्रमासाठी महाविद्यालयांना आर्थिक बळ दिले. या कार्यशाळेत चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम कसा असणार आहे. यामधील मेजर, मायनर विषय म्हणजे काय, क्रेडीट, करीक्युलर फ्रेमवर्क, एकाधिक प्रवेश आणि निर्गमन याबद्दलची माहिती देण्यात आली. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना मार्गदर्शन द्यावे, अभ्यासक्रमांची माहिती, उपलब्ध सुविधा याची माहिती देवून त्यांच्या शंकाचे निरसन करावे. अशा काही सुचना महाविद्यालयांना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने एकाचवेळी दोन दिवसात १६ हजार विद्यार्थ्यांपर्यंत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पोहचविण्यात आघाडी घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.