भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख
समर्थ रामदास स्वामींनी ‘दासबोध’ या ग्रंथात चतुर्थ दशकात वर्णिलेली नवाविध भक्तीतील आठवी पायरी म्हणजे ‘सख्य भक्ती’. अंहकार विसर्जनाचा अंतिम टप्पा. नदी सागराला ज्या ठिकाणी मिळते तो अंतिम टप्पा म्हणजे ‘सख्यभक्ती’. ‘अर्जुन’ म्हणजे सख्यभक्तीचे उत्तम उदाहरण आहे. राष्ट्रातील अनेक संतानी सख्य भक्ती केली. जोपर्यंत आपल्या आवडीनिवडी, हवे नको पण याला प्राधान्य असते तोपर्यंत सख्य भक्ती शक्य नसते. कडेवरच्या मुलाचा आई जसा संभाळ करते तसेच भगवंत भक्तावर प्रेम करतो.
नवरात्रीचे नऊ ही दिवस सर्वांचेच, सर्व भक्त उपासकांचे सख्य आई जगदंबेशी असते. इतर कोणताही उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा होत नाही इतके नवरात्र घरात व सार्वजनिक ठिकाणीही धामधुमीत संपन्न होतो. प्रत्येक व्यक्ती ही पवित्र शुर्चिभूत असते. घर व बाहेरचा परिसर स्वच्छ ठेवते. आपले अंतरंग बहिरंग यात कटाक्षाने पावित्र्य व मांगल्य जपले जाते. कटाक्षाने कुलधर्मा प्रमाणे षोड्पचारे पूजा होते व ती अष्टभुजा नारायणी तिचे स्वरूप पाहून अंतःकरण भरुन येते. अंतःकरण निर्मळ होते व देवीशी हितगुज होते. ज्ञानराज माऊली म्हणतात,
“तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा”
माऊली अंबाबाईला सत्- चित्-आनंदरूप मानतात व तुम्ही ही तसेच तिचे दर्शन घ्या. विठूमाऊलीला जसे माऊलीने कल्पले तसेच, आपण आठवी पायरीशी येऊन थांबलो आहोत. कल्पवृक्षाप्रमाणे असणारी जगन्माता तिची कृपा झाली, उपासक अभयकर झाला.
“खाली बैस हो आराम।” “मुखावरतीआला घाम। ” “विष्णुदास आदराने वारा घाली पदराने “
सख्य भक्तीचाच हा उत्कृष्ट अविष्कार. वृत्तीची जा-ये वर्दळ संपली. देहबुद्धी, जन्ममरणाचा पट फाटूनच गेला. इतक्या उंचीवर उपासक जाऊ शकतो. तर सर्वसामान्य भगिनी वर्गाचा भोळा भाव ही तितकाच प्रगल्भ असतो ती म्हणते,
“धाव ग अंबे पाव नवसाला,”
“नवस मी केला नऊ दिवसांचा “
“उपवास मी केला तुळजापुरला दिला ॥ धृ॥”
तुळजा पुरला जाऊन मी आई भवानी पाहिली,भावाची परडी तिला वाहिली व जोगवा तिला वाहिला हे सारं अंतःकरणपूर्वक अतीव प्रेमाने केलेले असते.
“उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आले गं ।”
“कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली गं “
“पैंजणाचा नाद आला गोड कानी गं ।”
हा तिचा भास नाही तर तिची ती उत्कट श्रद्धा आहे. तिच्यावर ही कुलस्वामीनी प्रसन्न होते व ती जी वाट पहाते, तिच वाट पहाणं संपतं व प्रत्यक्ष आईचे “आगमन”होते.
“नवसाला पावली आई। नवसाला पावली । “
“कशी कळेना आज अचानक झोपडीत आली.”
हा स्वानुभव व प्रचितीचा प्रांत आहे. पण कृपा होते हे निश्चित आहे. घरात प्रत्यक्ष आईच आगमन जीवन धन्य होते,कृतार्थ होते. अष्टमीला काही ठिकाणी यज्ञ होतो. काही जण देवीची मूर्ती हाताने घडवितात मंडपीवर साज शृंगार-लेण चढविले जाते. घरातील घटाला साष्टांग नमस्कार केला जातो. साडेतीन पीठांपैकी एक कुलस्वामिनी, उत्कट भावानं तिला आळवले जाते. “दंडवत सांग माझा दंडवत सांगा ” यात ‘माझा’ हा शब्द महत्वाचा आहे. जवळीक साधणारा आहे. सख्य भक्तीचं हे बोलकं उदाहरण आहे. देवीपर्यंत दंडवत पोहचलेला असतो.
॥ उदे ग अंबे उदे II
IIउदे ग अंबे उदे ||
भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे
मो. 8412926269