नवाविध भक्ति व नवरात्र – दास्यभक्ति

0

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख

समर्थ रामदास स्वामी यांनी ‘दासबोध’ या ग्रंथात चतुर्थ दशकात भक्तीची सातवी पायरी म्हणजे दास्य भक्ती वर्णिली आहे. ‘मी देवाचा देव माझा’ हा भाव इथं असतो व तो अखंड टिकवून ठेवायचा प्रयत्न करायचा असतो. भगवंत हा मालक आहे मी त्याचा दास आहे, जगाचा मालक होण्यापेक्षा दास होणे अधिक आनंददायी आहे, असे गोंदवलेकर महाराज म्हणतात, कबीरही भगवंताचा बंदा म्हणवून घेत. हनुमंत हा दास्यभावाचे एकमेव प्रतीक आहे. भरत व शत्रुघ्न विलक्षण पराक्रमी होते पण ते सुद्धा स्वतःला रामाचे दास म्हणवित असत. नाथांच्या घरी श्रीखंड्या पाणी भरत असे. जनाबाई नामदेव महाराजांकडे काम करीत असे. तर जनाबाईच दळण प्रत्यक्ष पाडुरंग दळू लागत असे. नामदेव विठ्ठलाची पुजा करीत तर विठ्ठल जनाबाईची सेवा करीत असे. एकूणच दास्य भाव हा सर्वात श्रेष्ठ भाव आहे व नवाविधभक्तीतील महत्तवाची पायरी आहे.

“देवाचे वैभव संभाळावे । न्यूनपूर्ण पडोचि नेदावे । “

“चढ़ते वाढते वाढवावे । भजन देवाचे “

नवरात्रातही या दास्यभावाचे विविध अंगाने दर्शन घडते व प्रत्यक्ष अनुभूति ही येते. कोणी नऊ दिवस उपवास करतात. कोणी देवीच्या साडेतीन पीठाचे दर्शन घेतात, षोडपचारे पूजा तर चालूच असते, कुणी गोंधळ घालतात. तर काहीजण जोगवा मागतात. कुणी घागरी फुंकतात. तर कुणी अष्टमीला यज्ञ करतात. देवी शक्तीचा जागर हा अनेक मार्गानी होत असतो. कुणी रात्री रात्री रास गरबा खेळून आनंद द्विगुणित करतात. मंदिरातून हरी कथा, कीर्तन , भजन, देवीची गाणी ही चालूच असतात. दिवसेंदिवस रंग गहिरा होत असतो सूखांची उधळण आसमंत भारावून टाकत असते.

देवीच्या उपासकांमध्ये स्त्री-पुरुष, आबाल वृद्ध, गरीब-श्रीमंत, शहरी- ग्रामीण, सुशिक्षित- अशिक्षित असा भेदभाव कधीच नसतो, तरीही भगिनीवर्गाचा खूपच उत्स्फूर्त असा सहभाग पहायला मिळतो हे नाकारता येत नाही. स्त्री मध्ये वात्सल्य भाव, मधुरभाव, सख्यभाव या भावनांचा उत्कर्ष सहज झालेला आढळतो.  ती देवीशी अनेक विध भावाचा एकविध भाव करून दास्यत्व उत्कृष्ट करू शकते. नवरात्रात ती आर्थिक शक्ती, बुद्धी नुसार शारीरिक, मानसिक,  आर्थिक  सर्व पातळीवर तिची सेवा करते व पुढे सारे करूनही काही न्यून राहिले असेल तर ‘पोटात घे, मला क्षमा कर, माफ कर किंवा पदरात घे’ असेही ती निर्मळ अंतः करणाने म्हणते. कुठलाही अहंगड तिच्या ठायी नसतो ती म्हणते,

“माय भवानी तुझे लेकरू”

“कुशीत तुझिया येई”

 “सेवा मानून घे आई”

सहज सुंदर समर्पण ती आईला करते. कोणती जगन्माता, कुलस्वामिनी  मग तिला जवळ करणार नाही? याच उत्तर ती तिला पदरात घेणारच. आज सप्तमीचा दिवस आहे. आई कुलस्वामिनीसाठी जाई, जुई, शेवंती, मालती अशी नानापरीची पुष्पे आणून तिला अर्पण केली आहेत.  आई जगदंबेचा  खूप वेळा प्रत्यय येतो  की उपासकावर संकट येते तेव्हा तेव्हा तू अलगद आम्हाला झेलते. ही प्रचिती आहे याची आम्हाला कल्पना नसते. तुझा वरदहस्त आहे म्हणूनच हे जग, त्यातील यच्चयावत प्राणिमात्र कार्यरत आहे.

॥ उदे ग अंबे उदे II 

IIउदे ग अंबे उदे ||

 

भाग्यरेखा पाटोळे

कोथरूड, पुणे

मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.