नवाविध भक्ति व नवरात्र – सद्गुरुपादसेवन

0

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख

समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध या ग्रंथात चतुर्थ दशकात ‘सदगुरूपादसेवन’ ही नवाविध भक्तीतील चौथी पायरी प्रतिपादली आहे. परब्रम्ह ही संकल्पना सूक्ष्म आहे. ज्याला आत्मदर्शन झाले आहे, भगवंतदर्शन झाले आहे अशा सत्पुरुषाच्या सहवासात राहून साधना करणे याला ‘सदगुरुपादसेवन’ म्हणतात. सदगुरूप्रति सेवा भाव, सदगुरुला प्रनिपात करणे याने सहजच  बुध्दी निर्मळ होते,चित्त स्थिर होते व साधनेचा मार्ग सुलभ होतो. भाग्यवशात असे सदगुरू लाभले तर सतशिष्याने तन-मन-धन झोकून देऊन त्यांनी दिलेल्या मंत्राच्या अनुसंधनाने संसार करतानाही राहणे यातच जीवनाची इति कर्तव्यता असावी.

“सद्वस्तु दाखवी सदगुरु। सकळ सारासार विचारु”I

“परब्रम्हाचा निर्धारु । अंतरी बाणेI”, कारण आत्मबोध हा संपूर्ण प्रचितीचाच प्रांत आहे. इथे श्रवण, मनन, पाठांतर सगळ्या गोष्टींचा हात धरूनच आपल्याला या आत्ममंदिरात प्रवेश मिळणार आहे. पण त्याचबरोबर हे सुध्दा लक्षात घ्यायला हवे की अभ्यास किंवा नाना साधने करून जे साधत नाही ते सदगुरू कृपेने सहज शक्य होते व त्यामुळेच अध्यात्मक्षेत्रात समर्थ सदगुरूंचे स्थान अनन्य साधारण आहे. अशा सदगुरूंचा शोध आपण जरूर घ्यावा. भक्तीमार्गातील परमोच्च सुख मिळवण्यासाठी कटिबध्द व्हावे.

आज नवरात्रीतील चौथा दिवस आहे. ही विश्वव्यापकजननी आपल्यासारख्या असंख्य  उपासकांकडे प्रेमळ अंतःकरणाने पहात आहे. कृपाळू दृष्टी तिची सर्वांवर आहे. पूर्ण भावानिशी भक्त वर्गही तिच्या चरणाशी लोटांगण घालत आहेत, साष्टांग नमस्कार करीत आहे. आजच्या दिवशी आई जगदंबेला आपण जोगवा मागताना मागण मागू या की, आम्ही पूर्ण बोधाची परडी भरु तेल- पीठ- मीठ परडीत पूर्ण भरून आम्ही सद्गुरूची शिकवण अंगी  बाणवणाचा प्रयत्न करू, निग्रह करुन आंम्हाला सहजच ज्ञान प्राप्त होण्याचा मार्ग सुलभ होईल.

आम्ही आमच्या आशा-आकांक्षा- तृष्णा याचा वेग जरा कमी करण्याचा प्रयत्न करु. मनुष्यप्राणी हा काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अंहकाराच्या सहज आहारी जातो. त्यात असंभवनीय असे काही नाही पण विशिष्ट मर्यादेपलिकडे हे षड्रिपू जाऊ नयेत नाहीतर ते विकारात जमा होतात. ‘आम्हाला नाही असे जमत, आम्हाला नाही असे पटत’ असे आपणच आपले समर्थन करणार हे योग्य नसते. सावधपणे आपण रहावे नाहीतर हे षड्रिपू आपल्यावरच सत्ता गाजवणार. भाजीत मीठ जास्त पडले किंवा घालावयाचे विसरले तर आपण रागावू नये किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना टोकांची भूमिका घेणे, या दोन्ही गोष्टी मनोविकारात  मोडतात. म्हणून तर आई जगदंबे जवळ म्हणायचं,

“पूर्ण बोधाची भरीन मी परडी ॥”

“आशा मनशांच्या पाडीन दरडी I।”

“मनोविकार कुरवंडी ।। अमृतरसाची भरीन दुरडी ॥

अशा आशा,तृष्णा, मनोविकार मी कुरवंडी करणार म्हणजे ओवाळून टाकणार. त्यांचा नामशेष मी मजजवळ ठेवणार नाही. पण या गोष्टी वाटतात तितक्या सहजसुलभ नसतात. सद्गुरुकृपा झाली तरच बोध किंवा आत्मज्ञान शक्य असते. ते सद्गुरुपादसेवन करून मी प्राप्त करून घेईन.

“जोगवा मागते, जोगवा घाला”

“अंबाबाईचा जोगवा  घाला”

“जोगवा मागते कोल्हापुरी”

“हळदीकुंकवाचा जोगवा घाला”

“खणा नारळाचा जोगवा घाला”

अशी भावपूर्ण आळवणी अंबामातेला करता करता माझी परडी मिठा-पिठाने, हळदी कुकुंवाने संपन्न तर असेलच पण बोधाच्या अंगाने मी अतरंग अधिकार ही संपन्न करून मी त्या जगदंबेला प्रसन्न करून घेणार आहे.

 

॥ उदे ग अंबे उदेII

II उदे ग अंबे उदे ||

 

भाग्यरेखा पाटोळे

कोथरूड, पुणे

मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.