…तर डॉ. उल्हासदादा – नाथाभाऊ लढत ?

चाहुल लोकसभेची : सक्षम उमेदवाराचा शोध सुरु

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अंतरीम अर्थसंकल्पाने लोकसभा निवडणुकांची चाहूल दिली असून त्या दृष्टीकोनातून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली असून त्या दृष्टीकोनातून सक्षम उमेदवारांचा शोध सुरु झाला असून रावेर मतदारसंघासाठी भाजप जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना उमेदवारी देवू केली तर भाजप देखील माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देवू शकतो?

भारतीय जनता पक्षाने गेल्या दोन महिन्यांपासून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली असून गावनिहाय संपर्क साधण्यावर भर दिला असताना त्या दृष्टीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अद्यापही तळ्यात-मळ्यात सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुतांश लोक भाजपाच्या संपर्कात असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी सक्षम उमेदवाराच्या शोधात असून हवे तसे नाव पुढे येत नसल्याने वरिष्ठपातळीवर देखील खल सुरु आहे.

जळगाव जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ असून रावेर मतदारसंघासाठी उमेदवारांची मोठी रिघ आहे, तर जळगावसाठी सारेच पक्ष चाचपणी करीत आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना डच्चू मिळण्याचे संकेत मिळत असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉ. उल्हास पाटील कन्या डॉ. केतकी पाटील यांनी घेवून भाजपाच्या गोटात दाखल झाल्याने ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहे. रावेर मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला असल्याने विद्यमान आमदार शिरीष चौधरींचे नाव पुढे येत असले तरी त्याची मानसिकता दिसत नाही.

डॉ. केतकी पाटलांचे काय?

काँग्रेसच्या गटातून भाजपाच्या तंबूत दाखल झालेले डॉ. उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनी मतदारसंघात जनसंपर्क अभियानाला सुरुवात केल्याने डॉ. केतकी पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा रंगत आहे; परंतु प्रवेश सोहळ्याप्रसंगीच डॉ. केतकी यांना महिला प्रदेश उपाध्यक्षा केल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत शाशंकता निर्माण झाली आहे. कारण भाजपात एक व्यक्ती एक पद असे समीकरण असल्याने सारेच बुचकांड्यात आहेत.

… तर डॉ. उल्हासदादा, नाथाभाऊ लढत?

राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना उमेदवारी देवू केली तर भाजपासमोर देखील मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. एकनाथराव खडसे हे राज्यातील मुरब्बी नेते असून त्यांना मतदारसंघाची संपूर्ण जाण आहे. प्रशासनावर असलेली प्रकड, जनतेशी असलेली सामाजिक बांधिलकी, कार्यकर्त्यांची फळी आणि स्नुषा रक्षाताई खडसे यांनी केलेले काम हे खडसेंच्या उमेदवारीसाठी जमेच्या बाजू ठरु शकतात. त्यांच्या तोडीचा उमेदवार भाजपाकडे मंत्री गिरीश महाजन यांच्या रुपाने आहे, मात्र महाजनांना वरती जाण्याची घाई नाही, त्यामुळे ती उमेदवारी डॉ. उल्हास पाटील यांच्या पदरात पडण्याची शक्यता अधिक आहे. डॉ. उल्हास पाटील यांच्या गाठीशी लोकसभेचा अनुभव आहे. शिवाय त्यांचा या मतदारसंघात मोठा जनसंपर्क असून रुग्णसेवेच्या माध्यमातून ते जनतेला चांगले परिचित आहेत. डॉ. पाटील यांच्याकडे मॅनपॉवर मोठ्या प्रमाणावर असून, मृदू स्वभाव, प्रत्येकाला मदत करणे, मीडीयाशी असलेले चांगले संबंध त्यांच्या उमेदवारीसाठी पोषक ठरु शकतात

Leave A Reply

Your email address will not be published.