पाचोऱ्याचा विराज चंदन अबॅकस स्पर्धेत देशातून पहिला…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

गणितीय कार्ये जलदगतीने करण्यासाठी वापरले जाणाऱ्या अबॅकस शिक्षण प्रणालीची देशस्तरीय स्पर्धा नुकतीच कोल्हापूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत पाचोरा येथील चौथीत शिकणारा श्री समर्थ प्रो ऍक्टिव्ह अबॅकस पाचोरा आणि सक्षम प्रो ऍक्टिव्ह अबॅकस, भडगाव या प्रशिक्षण केंद्राचा विद्यार्थी विराज मंजीत चंदन याने देशभरातील अडीच हजार स्पर्धकांना मागे टाकत देशातून पहिले येण्याचा विक्रम केला आहे. त्याने केवळ चार मिनिटांत शंभर बिनचूक गणिते सोडवण्याचा विक्रम केला. त्याच्या या यशामुळे पालकांसह, श्री समर्थ प्रो ऍक्टिव्ह अबॅकस पाचोरा आणि सक्षम प्रो ऍक्टिव्ह अबॅकस, भडगाव प्रशिक्षण केंद्रासह प्रशिक्षक रवींद्र पाटील व सपना शिंदे यांचे देशपातळीवर नाव उंचावले आहे. दरम्यान प्रशिक्षण केंद्राला देखील ‘बेस्ट सेंटर’ चा बहुमान मिळाला आहे.

या परीक्षेत भारतातील वेगवेगळ्या दहा राज्यातील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांची प्रादेशिक स्तरावरून निवड झाली होती. सहा मिनिटात १०० गणिते सोडवणे असे या परीक्षेचे स्वरूप होते. विराज मंजीत चंदन याला विनर्स ट्रॉफीसह सायकल बक्षीस म्हणून मिळाली तसेच ‘मॅन्स मॅजिशियन’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यासाठी त्याला ११ हजार १११ रुपयांचे रोख बक्षीस देखील मिळाले. विराज सोबतच क्लासचे अयान असलम पिंजारी या विद्यार्थ्यांने लेव्हल वन मधून चतुर्थ क्रमांक मिळवला आहे. तसेच ध्रुवी सचिन पाटील या विद्यार्थिनीने लेव्हल वन मधून आठवा क्रमांक पटकावला. पाचोरा तालुक्यासह जिल्हा व राज्याचे नाव पूर्ण देशभरात उंचावले आहे. दरम्यान मास्टर ट्रेनर रविंद्र पाटील आणि सपना शिंदे यांचे पालकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.