दरोड्याच्या तयारीत असलेले चाळीसगावचे 5 आरोपी नाशिक पोलिसांच्या जाळ्यात…

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असलेल्या चाळीसगावच्या कुख्यात हैदर टोळीच्या पाच सदस्यांना भद्राकाली पोलीस ठाण्याच्या पथकाने पाठलाग करून पकडले आहे. त्यांच्या जवळून देशी बनावटीचा गावठी कट्टा, जीवंत काडतुसे, चॉपर व कार,मोबाईल असा सुमारे 8 लाख 17 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने चाळीसगावात गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार धनंजय हासे यांना गुप्त माहीती मिळाली की, काठे गल्ली परीसरात ग्रे रंगाची मारूती कंपनीची स्विफ्ट कार मध्ये संशयीत इसम फिरत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली  6 रोजी पहाटे 1.20 वाजेच्या सुमारास काठे गल्ली सिग्नल जवळ नाशिक पुणे रोडवर नाशिक येथे मारुती कंपनीची ग्रे रंगाची स्विफ्ट कार क्र.एमएच.03 डीएक्स.7711 या वाहनामध्ये आरोपी नामे विशाल ओमप्रकाश राजभर (30) रा. डेजरी एरिया, हिरापुर रोड चाळीसगाव, अजय हिरामण राठोड(19) रा. नागद रोड आठवडे बाजार चाळीसगाव, शोएब अस्लम शेख (25),रा. नागद रोड आठवडे बाजार चाळीसगाव, दानिश रशिद मनियार(22) रा.नवेगाव, इस्लामपुरा चाळीसगाव व नुरुद्दीन शरिफुद्दीन शेख (22)रा. हुडको कॉलनी नगरपालीका मंगल कार्यालयाजवळ चाळीसगाव हे मिळून आले. त्यांचेकडे अग्नीशस्त्र, धारदार शस्त्र व घरफोडीच्या हत्यारे मिळाली. दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीसह काठे गल्ली सिग्नल जवळ नाशिक पुणे रोडवर नाशिक येथे त्यांचे वाहनातून जात असताना भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर वाहनाचा पाठलाग करून वाहन त्यांचे वाहनाचे पुढे आडवे लावून या पाच जणांना पकडले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडुन धारदार शस्त्र व घरफोडीचे हत्यार मिळून आले. त्यात एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, 4 जीवंत काडतुसे, लोखंडी गुप्ती,चॉपर,लोखंडी कटावणी, 5 मोबाईल, कार असा सुमारे 8 लाख 17 हजार 520 रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त किरण चव्हाण, सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक गजेंेद्र पाटील, सहाय्यक निरीक्षक किशोर खांडवी, एस.डी. बिडगर,पोना. रमेश कोळी,लक्ष्मण ठेपणे, शेळके, सागर निकुंभ, धनंजय हासे,एम.व्ही. बोरसे, सोनार, गायकवाड यांच्या पथकाने केली.

शोएबवर 5 गुन्हे

नाशिक पोलीसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चाळीसगावच्या ज्या पाच दरोडेखोरांना पकडले त्यातील शोएब अस्लम शेख रा. नागदरोड चाळीसगाव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चाळीसगाव पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात शरीराविरूद्ध तसेच मालमत्तेविरूद्धचे पाच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हैदर टोळीचा मोरक्या शोएब शेख हा तडीपार असून इतर संशयित पोलिसांच्या हिस्ट्रीसिटरवर  आहेत. दरम्यान हैदर टोळीच्या शोएब शेखसह पाच जणांना दरोड्याच्या तयारीत असतांनाच नाशिक पोलीसांनी त्यांच्या मुस्नया आवळल्याने चाळीसगावात गुन्हेगारी वर्तुुळात एकच खळबळ उडाली आहे.या पाचही जणांविरुद्ध भद्राकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी हे करीत आहेत. तर तपासात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.

त्या गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत होणार कारवाई

दरम्यान नाशिक पोलीसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या ज्या पाच जणांना पकडले आहे त्यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे चाळीसगाव पोलीस ठाण्यात दाखल असून त्यांच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती पेालीस सुत्रांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.