नरेंद्र चपळगावकर ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी…

0

 

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या (Marathi Literary Conference) अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्‍त न्‍या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्‍यात आली आहे. विदर्भ साहित्य संघाच्‍या शताब्‍दी महोत्सवानिम्मित वर्धा येथे आयोजित होत असून,  या निवडीची घोषणा अ. भा. मराठी साहित्‍य महामंडळाच्‍या अध्‍यक्ष प्रा. उषा तांबे यांनी वर्धा येथे पार पडलेल्‍या पत्रकार परिषदेत केली.

मंगळवारी प्रा. उषा तांबे यांच्‍या अध्‍यक्षतेत अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाची बैठक पार पडली. यात विविध घटक संस्‍थांकडून प्राप्‍त झालेल्‍या नावांवर चर्चा करण्‍यात आली. त्‍यातून न्‍या. नरेंद्र चपळगावकर यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले. या बैठकीला महामंडळाच्‍या कार्यवाह डॉ. उज्‍ज्‍वला मेहेंदळे, कोषाध्‍यक्ष प्रकाश पागे, उपाध्‍यक्ष रमेश द. वंसकर, विद्यमान संमेलनाध्‍यक्ष डॉ. भारत सासणे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे व कार्यकारिणी सदस्‍य तसेच, विदर्भ साहित्‍य संघाचे अध्‍यक्ष प्रदीप दाते, ‍विलास मानेकर, गजानन नारे इत्‍यादी उपस्‍थ‍ित होते.

96 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिनांक ३,४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर होत आहे. या साहित्य संमेलनाच्‍या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी दत्ता मेघे यांनी स्‍वीकारली असून संरक्षपदाची जबाबदारी सागर मेघे यांनी सांभाळली आहे. या साहित्य संमेलनाच्या मार्गदर्शक केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी हे आहेत. विदर्भ साहित्य संघ ही या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे.

या संमेलनाचे उद्घाटन ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता होईल. त्यापूर्वी महामंडळाचे ध्वजारोहण करण्यात येईल. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन २ फेब्रुवारीला पूर्वाध्यक्षांच्या डॉ. भारत सासणे यांच्‍या हस्ते होणार असून यात साधारणत: ३०० गाळे राहणार आहेत. संमेलनाची सुरुवात प्रथेनुसार ग्रंथदिंडीने 3 तारखेला सकाळी ८.३० वाजता होईल. मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कवी संमेलने, कवी कट्टा, असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. संमेलनाचा समारोप ५ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता होईल, अशी माहिती प्रा. उषा तांबे यांनी दिली. विदर्भ साहित्‍य संघाचे अध्‍यक्ष प्रदीप दाते यांनी हे संमेलन वेगळ्या पद्धतीने व कायम लक्षात राहावे, यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे सांगितले.

प्रा. उषा तांबे म्‍हणाल्‍या, आजवर साहित्‍य संमेलनाला लेखक, कवी अध्‍यक्ष म्‍हणून लाभले. पण यावेळी नरेंद्र चपळगावकर यांच्‍या रूपाने विचारवंत लेखक तसेच, तर्कनिष्‍ठ व तत्‍वनिष्‍ठ भूमिका असलेला साहित्यिक संमेलनाध्‍यक्ष झाले आहेत.

निवृत्‍त न्‍या. नरेंद्र चपळगावकर यांचा परिचय

नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. ते सध्‍या गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडमध्‍ये कार्यरत असून नरहर कुरुंदकर न्यासाचे एक विश्वस्त आहेत. ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात.

चपळगावकर यांचे अनेक वृत्तपत्रांतून लेख प्रसिद्ध झाले असून ललित, भाषाविषयक, समीक्षा, न्यायविषयक कथा, व्यक्तिचित्रणे प्रकाशित आहेत. राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, मसापच्या विभागीय मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्‍यक्षपद त्‍यांनी भूषविले आहे. भैरुरतन दमाणी पुरस्कारासह त्‍यांना अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.