शेतकऱ्याचा अनोखा जुगाड; जुनी बाईक १४ रुपयांत १०० किमी पार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नांदेड

अर्धापूर : –  तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील अवलियाने जुन्या मोटारसायकलवर प्रयोग करून तब्बल दोन वर्षांनी चार्जिंग वर चालणारी बाईक बनवली आहे. फक्त १४ रुपयांमध्ये १०० किमी अंतर पार करता येत आहे.

देशात दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमती आणि वाढते प्रदूषण या सध्याच्या काळातील मोठ्या समस्या आहेत. त्यावर पर्यायी मार्ग म्हणून आजकाल लोक पेट्रोल बाईक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक बाईक्सचा पर्याय स्वीकारत आहे. अशातच अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील शेतकरी कुटुंबातील युवा शेतकऱ्याने प्रदूषण मुक्त चार्जिंगची मोटारसायकल बनवत शेतातील कामे फुले आदी बाजारपेठेत व शेतातील दळणवळणासाठी चार्जिंग बाईक बनवली आहे.

अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव या गावात रहात असलेल्या ज्ञानेश्वर उमाजीराव कल्याणकर या ३० वर्षीय तरुणाने इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी प्रदूषण मुक्त अशी मोटारसायकल तयार केली आहे. फक्त १४ रुपये खर्चामध्ये चार तास चार्ज केल्याने तब्बल १०० किमीचे अंतर पार करता येते. ही मोटारसायकल बनवण्यासाठी बॕटरीच्या दर्जानुसार २६ ते ४० हजार रुपये खर्च येतो. पिंपळगाव महादेव शिवारात पारंपारिक पद्धतीने शेती न करता विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे शेती करतात.

गत दोन वर्षांपासून लॉकडाऊन, लग्न समारंभ आदी कार्यक्रम छोटेखानी होत असल्याने फुल शेतीतुन दळणवळणाचा खर्च निघत नसल्याने तरूण शेतकऱ्यांने लॉकडाऊन मध्ये चार्जिंगवरील मोटारसायकल बनवण्याचा प्रयोग करण्याचा संकल्प करत विजेवर चालणारी मोटारसायकल तयार करण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. त्याच्या या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

◾पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहने अनेकांनी बघितली आहेत. मात्र चार्जिंगवर बनवलेली मोटारसायकल पहिल्यांदाच बनवण्यात आली. ही सायकल पाहण्यासाठी गावातील नागरिक मोठी गर्दी करत आहे.

◾१४ रूपयात १०० किमी प्रवास

चार्जिंग मोटरसायकल बनवण्यासाठी ४० हजार रुपये खर्च आला. मोटार ७५० होल्ट , बॅटरी ४८ होल्ट ,चार्जर,कंट्रोलर,लाईट, एक्सलेटर, इलेक्ट्रिक ब्रेक यांच्यासह वेल्डींगचा वापर करत ही मोटारसायकल बनविण्यात आली आहे.

◾फसलेले ट्रॕक्टर ओढण्याची शक्ती

पुढील काळात या चार्जिंग मोटारसायकलवर आणखी संशोधन करून २००० व्हॕटची मोटार बसवल्यास फसलेले ट्रॕक्टर ओढून काढता येते. जेव्हढे जास्त होल्टेज मोटार तेवढे जास्त वजन ओढल्या जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.