कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ‘हे’ दोन अधिकारी ईडीच्या निशाण्यावर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी ईडीच्या रडारवर पाहायला मिळत आहे. संजीव जैस्वाल यांच्या पाठोपाठ आयिक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal), अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याही अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीकडून कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सलग दोन दिवस मुंबई, ठाण्यासह 14 ठिकाणी छापेमारी केली गेली. या छापेमारीत ईडीच्या हाती कोट्यावधींचे घबाड लागले आहे. अशातच मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कोविड काळात बहुतांश निर्णय महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या मंजुरीनेच घेण्यात आले, तर त्यासंबंधाचे व्यवहार पालिकेच्या खरेदी खाते विभागाने हाताळले. या खात्याची सूत्रे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या हाती आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कोरोना काळात मुंबईतील कोविड सेंटर उभारणे, ऑक्सिजन पुरवठा, औषधे, रेमडेसिव्हिर यांची खरेदी विनानिविदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिका स्थायी समितीने कोरोना उपाययोजनांसाठी खर्चाचे अधिकार एका ठरावाद्वारे आयुक्तांना दिले होते. मात्र आयुक्तांनी ठरावातील अटी-शर्तीनुसार स्थायी समितीकडे वेळोवेळी प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले नाहीत. अनेक प्रस्ताव परस्पर मंजूर करून खर्चाचा हिशोबही दिला नाही. त्यामुळे कोरोना कालावधीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.