ब्रेकिंग ! आमदार अपात्रतेवर महानिकाल, पहा अपडेट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाचा मोठा दिवस आहे. शिवसेनेचे भवितव्य घडवणारा आजचा महत्वाचा दिवस आहे. आज आमदारांच्या अपात्रतेवर महानिकाल येणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या 16 तर उद्धव ठाकरे यांच्या 14 आमदारांच या अपात्रतेच्या निकालानं भवितव्य ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देताना त्याचे वाचन करीत आहेत.  यावेळी दोन्ही गटाचे आमदार उपस्थित आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज, बुधवारी निकालाचं वाचन केलं. खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे असं आज राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची ही घटनाच हे सांगते आहे की त्यात कशी पदरचना आहे. त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची आहे? याचा निर्णय घेतला आहे. 21 जून 2022 ला शिवसेनेत दोन गट पडले. सगळ्या पुरावे, साक्षी यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे ही मान्यता देतो असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

सुभाष देसाई विरुद्ध राज्यपाल या प्रकरणाचं वाचन आधी राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत, त्यामुळे मी निवडणूक आयोगाने दिलेली घटना विचारात घेतली आहे असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुख कोण यावरुन गोंधळ असल्याचं दिसलं. उद्धव ठाकरेंनी जी शिवसेनेची घटना दिली त्यावर कुठलीही तारीख नाही असंही राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची 1999 ची घटना मी मान्य करतो असंही राहुल नार्वेकर म्हणाले. तसंच उद्धव ठाकरे हे उलट तपासणीसाठी आले नाहीत त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र विचारात घेतलेलं नाही असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी 2018 मध्ये केलेली घटना दुरुस्ती ही अयोग्य होती, असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे 1999 मध्ये घटनेत केलेले बदल बरोबर आहेत. त्यामुळं त्यावेळची घटना वैध मानता येईल. पण 2018 मध्ये करण्यात आलेले बदल वैध नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले. विशेष म्हणजे राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही, असं निरीक्षण नोंदवलं. हा निर्णय कार्यकारिणीने घ्यायचा असतो. उद्धव ठाकरेंनी असा निर्णय घेणं हे लोकशाहीला घातक असल्याचंही ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना कुणाची? यावर आधी निर्णय दिला त्यानंतर त्यांनी आपण अपात्रतेवर निर्णय देणार असं म्हटलं आहे. शिवसेनेची घटना, त्यात 2018 मध्ये जी दुरुस्ती करण्यात आली ती बाब चुकीची आहे असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने काय निकाल दिला तेदेखील मी विचारात घेतलं आहे असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तसंच विधिमंडळातलं बहुमत काय आहे? तेदेखील लक्षात घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सगळ्यासाठी योगेश कदम यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या सगळ्या निकषांवर खरी शिवसेना कुणाची? निर्णय घेतल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.