संतापजनक.. बालसुधारगृहात मुलावर अनैसर्गिक अत्याचार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगावातून संतापजनक घटना समोर आली आहे.  जळगावातील शासकीय बालसुधार गृहात एका १० वर्षीय मुलावर १३ वर्षीय मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ३१ ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी बुधवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासकीय मुलांचे बालसुधारगृह आहे. येथे १० वर्षीय बालक वास्तव्याला आहे. ३१ ऑगस्ट रोजी रात्री १० वर्षीय बालक झोपलेला असतांना सोबत राहणारा १३ वर्षीय मुलाने त्याला झोपेतून उठवून वरच्या मजल्यावर नेले. तिथे बाथरूमच्या समोरील जागेत त्याला लाथ मारून खाली पाडले व त्याच्या सोबत अनैसर्गिक कृत्य केली. हा प्रकार कुणाला सांगितला तर मारहाण करण्याची धमकी दिली.

दरम्यान बालसुधारगृहाचे अधिक्षक रविकिरण अहिरराव यांनी पिडीत बालकाला विश्वासात घेवून चौकशी केली असता  त्याने घडलेला प्रकार कथन केला. यानंतर बुधवार १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता बालसुधारगृहाचे अधिक्षक रविकिरण अहिरराव यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.