राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण आजही राज्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला आहे.एकीकडे उकाड्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत असल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांना 13 ते 14 एप्रिल रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात सध्या ऊन- पावसाचा खेळ सुरु आहे. एकीकडे सूर्य आग ओकत आहे तर दुसरीकडे अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यातील या बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्यांसोबत शेतकऱ्यांना देखील बसत आहे. आतापर्यंत राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत होता. पण बुधवारी रात्री मुंबईच्या (Mumbai) अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, नागपूर या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना देखील अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.